हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिन्धे व भाजपचा मस्तवालपणा गाडून महाराष्ट्रात शिवशाही आणण्यासाठी बदनापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आणा… शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे स्टेटमेंट… बदनापूर अंबड हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला… पण 2014 ला भाजपचे नारायण कुचे इथून निवडून आले यानंतर शिवसेना येथून बॅक फुटला फेकली गेली… सध्याही कुचेच इथले विद्यमान आमदार आहेत… तर दुसरीकडे त्यांचे विरोधक माजी आमदार संतोष सांबरे हे शिवसेना ठाकरे गटात तर बबलू चौधरी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत… लोकसभा निवडणुकीतही सारी ताकद लावूनही बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघात निकाल हा महायुतीच्या म्हणजेच नारायण कुचे यांच्या विरोधात गेला आहे… त्यामुळे कुचे हे कमळावर स्वार होत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी मशालीच्या उजेडात बदनापूर उजळण्याची शक्यता सध्या तरी दाट दिसतेय… बदनापूर अंबडमध्ये विधानसभेला नेमकं काय घडेल? नारायण कुचे यांची हॅट्रिक आरामात मारतील? की त्यांना क्लीन बोल्ड करत बबलू चौधरी किंवा संतोष सांबरे यांपैकी एक जण आमदारकीवर ठाण मांडून बसेल? याच बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची ग्राउंड रियालिटी पाहुयात
प्रस्थापितांच्या विरोधात निकाल देण्याची परंपरा म्हणून तशी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची आगळीवेगळी ओळख… 1990 पर्यंत इथं कुठल्याच एका फिक्स चेहऱ्याला किंवा पक्षाला जनतेनं निवडून दिलं नाही… इथला आमदारकीचा चेहरा आणि त्यांचा पक्ष हा नेहमी फिरताच राहिला… अशातच उजाडली 1990 ची विधानसभा निवडणूक… 1990 ते 1999 अशा सलग तीन टर्म इथून शिवसेनेच्या नारायण चव्हाण यांनी निवडून जाण्याचा रेकॉर्ड केला… 2004 लाही त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त होते, मात्र शिवसेनेने उमेदवारीचा चेहरा बदलला आणि भानुदास घुगे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं… 2004 ला झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अरविंद चव्हाण यांनी शिवसेनेचा हा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून घेत इथून घड्याळाची टिकटिक सुरू केली…
मात्र 2009 ला मतदारसंघाची बांधणीच नव्याने झाली… जालना भोकरदन जाफराबाद अंबड अशा चार तालुक्यातील गावांचा मिळून नवा बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघ तयार झाला… आणि विशेष म्हणजे तो अनुसूचित जातीसाठी राखीवही झाला… या नव्या कोऱ्या मतदारसंघाची निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीच्या बबलू चौधरी यांना आसमान दाखवत शिवसेनेचे संतोष सांबरे इथून पुन्हा आमदार झाले… बदनापूर मतदारसंघ शिवसेनेचाच हे जणू ठासूनच या निकालातून स्पष्ट झालं… या मधल्या काळात शिवसेना मतदारसंघातील गावागावात रुजली… मोठी झाली… तळागाळात जाऊन पोहोचली पण 2014 ला राजकारणाचे सगळे डायनॅमिक्स बदलून गेले होते… भाजपच्या बाजूनं वारं होतं… अशातच युती आणि आघाडी या निवडणुकीत स्वतंत्र लढली… तेव्हा मतदार संघात पहिल्यांदाच भाजपच्या नारायण कुचे यांनी आमदारकीचं मैदान मारलं… राष्ट्रवादीचे बबलू चौधरी दुसऱ्या क्रमांकावर राहिले.. तर तत्कालीन शिवसेनेचे आमदार संतोष सांबरे हे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले… 2019 लाही याच निकालाचा रिपीट टेलिकास्ट झाला… कॅबिनेट मंत्रीपद… राज्यमंत्रीपद आणि रावसाहेब दानवेंचा मोठा फोर्स नारायण कुचे यांच्या पाठीशी असल्याने 2019 लाही राष्ट्रवादीच्या बबलू देशमुख यांच्या विरोधात नारायण कुचे निवडून आले…तेव्हा कुचे यांचे लीड होतं 18612 इतकं…
सद्यस्थितीत नारायण कुचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत… बबलू चौधरी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणं पसंत केलय… तर संतोष सांबरे यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रति असणारी निष्ठा कायम ठेवत शिवसेनेची मशाल हातात घेतलीय… या सगळ्यात बदनापूर विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला काँग्रेसला 13742 इतकं लीड मिळालय… हा आकडाच स्पष्ट सांगतोय की, नारायण कुचे यांची आमदारकी धोक्यात आहे… पण खरा संघर्ष हा निवडणुकीआधी तिकीट वाटपाच्या वेळेस होणार आहे… तब्बल तीन टर्म निवडणूक लढवून यश पदरात जरी पडलं नसलं तरी बबलू चौधरी यंदाही तुतारीच्या चिन्हावर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत… तर दुसऱ्या बाजूला ही मूळ जागा शिवसेनेची असल्याने संतोष सांबरेंसह उद्धव ठाकरेंनीही इथून तगड्या प्रचाराला सुरुवात केलीये… त्यामुळे जागा कुणाला सुटणार? बंड होण्याचे काही चान्सेस आहेत का? मनोज जरांगे फॅक्टर मतदारसंघात कसा वर्कआउट करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जितकी क्लियर होतील तितकं मतदारसंघाच्या संभाव्य आमदाराबाबत आपल्याला भाष्य करता येईल…
विकासकाम निधीचा आपण पुरेपूर फायदा मतदार संघातील जनतेसाठी केला असल्याचं आमदार साहेब कुचे हे अगदी ठामपणाने सांगतात… अनेक योजना राबवण्यापासून ते पायाभूत सुविधांची संथ गतीने का होईना पण काम चालू असल्याचं मत स्थानिक पत्रकारांकडून समजतं… स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भाजपची मजबूत पकड असल्याने आणि लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीला दुसरे मुद्दे महत्त्वाचे ठरत असल्याने इथून संतोष सांबरे यांना प्रचारात आणखीन आक्रमकपणा आणावा लागणार… एवढेच नाही तर विद्यमान आमदारांना डॅमेज करण्याचं कौशल्यही सांबरेंना अंगात भिनवता आलं तरच बदनापूर मतदारसंघात मशालीच्या उजेडाची वाट पाहायला मिळेल… रहदारी, ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली चाळण, पाण्याचा ज्वलंत प्रश्न, अस्मानी आणि सुलतानी संकट यात पिळून गेलेला आणि प्रशासनाचे उंबरठे झिजवून त्रस्त झालेल्या शेतकरी याला तोंड विद्यमान आमदारांना तर याची दखल इच्छुक उमेदवारांना निवडणूक प्रचारात घ्यावी लागणार आहे…
त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातून यंदा आमदार कोण होतोय? भाजपकडून नारायण कुचे, मविआत शरद पवार गटाकडून बबलू चौधरी, ठाकरे गटाकडून संतोष सांबरे की डॉ. संजय पगारे यांच्यात आमदारकीचा गुलाल कुणाला लागतोय? शिवसेना आपला पारंपारिक बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी बळ लावणार का? की लोकसभेच्या निकालाला रिव्हर्स फिरवत नारायण कुचेच आमदारकीची हॅट्रिक साधणार? तुम्हाला काय वाटतं? या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…