तुषार कलबुर्गी | आपण आजपर्यंत पेन्सिल, वाॅटरकलर, आॅईलपेंट, अॅक्रेलिक पेंट, स्प्रे-पेंट अशा अनेक प्रकारांनी काढलेली चित्र बघितली असतील. पण रक्तचित्र हा प्रकार ऎकलाय कधी? होय! बाबा आमटेंच्या आनंदवनमधील प्रल्हाद ठक या कलाशिक्षकाने स्वतःच्या रक्ताने चित्र काढली आहेत. रक्तचित्र हा शब्द ऎकूनच अंगावर काटा यावा. पण प्रदर्शनात लागलेली चित्र डोळे दिपवून टाकतात. शरीराच्या कुठल्याही भागात सुईसारखं काही टोचलं तर लगेच ओरडणारे आपण जेव्हा स्वतःच्याच हाताच्या बोटांना सुई टोचून, त्यातून येणाऱ्या रक्ताने चित्रं साकारणाऱ्या प्रल्हाद यांना पाहतो तेव्हा थक्क होऊन जातो.
“ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राण वेचले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी हा माझा रक्तचित्र काढण्यामागचा उद्देश आहे”, असं प्रल्हाद ठक सांगतात. या चित्रांमगची प्रेरणा बाबा आमटे आहेत म्हणून पहिलं रक्तचित्र बाबा आमटेंचं काढलं असंही ते आवर्जून नमूद करतात.
एकामागोमाग एक अशी रक्तचित्र बघून आपल्या मनात प्रल्हाद ठक यांच्याबद्दल कौतुकाची भावना भरून अाली नाही तरच नवल! या रक्तचित्रांचे प्रदर्शन ९,१० आणि ११ जानेवारी या दिवशी पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील. कलारसिकांसाठी चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या रक्तचित्रांचे प्रदर्शन एक पर्वणीच ठरत असून पुणेकरांसोबत बाकी लोकांनीही हे प्रदर्शन आवर्जून पहायला हवंच.
प्रल्हाद ठक यांनी २००७ मध्ये रक्ताने पहिलं चित्र काढलं. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, यांच्यासारखे स्वातंत्र्यसेनानी, तसेच समाजसुधारणेसाठी प्राण वेचलेल्या बाबासाहेब आंबडेकर, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे अशा महान व्यक्तींची तब्बल १२४ चित्र त्यांनी आतापर्यंत काढली आहेत.