रक्तरंजीत फोटो, मृतदेह TV वर दाखवू नयेत; सरकारकडून सर्व चॅनलना सक्त ताकीद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने सर्व TV चॅनेल्सला आपल्या वाहिनीवर मृतदेहाचे फोटो, रक्ताने माखलेले फोटो अथवा कोणतेही त्रासदायक ठरणारे फुटेज दाखवू नये असा कडक सल्ला दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज, 9 जानेवारी रोजी सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना अपघात, मृत्यू आणि हिंसेच्या घटनांची माहिती देण्याबाबत ऍडव्हायजरी जारी केली आहे ज्यामध्ये महिला, मुले आणि वृद्ध यांच्यावरील हिंसाचाराचा समावेश आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, टीव्ही चॅनेलवर व्यक्तींच्या मृतदेहाचे फोटो, किंवा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तींचे फोटो/व्हिडिओ, स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांसह लोकांना बेदम मारहाण केल्याचा विडिओ, लहान मुलाचे सतत रडणे आणि ओरडणे यांसारखे व्हिडिओ दाखवले जातात. खरं तर फोटो अस्पष्ट करण्याची म्हणजेच ब्लर करण्याची कोणतीही खबरदारी न घेता ते आणखी भयानक पद्धतीने दाखवलं जात. अशा घटनांचे रिपोर्टींग करण्याची पद्धत प्रेक्षकांसाठी अप्रिय आणि त्रासदायक ठरत आहे. मंत्रालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की बहुतेक प्रकरणांमध्ये व्हिडिओ सोशल मीडियावरून घेतले जातात आणि एडिट न करताच प्रसारित केले जातात.

अशा प्रसारणाबद्दल चिंता व्यक्त करून आणि मोठ्या सार्वजनिक हिताचा विचार करून तसेच वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रेक्षकांच्या मनाचा विचार करून, मंत्रालयाने सर्व खाजगी टीव्ही चॅनेल्सना गुन्हे,अपघात आणि हिंसाचार, मृत्यू, गुन्हेगारी यांसंदर्भातील रिपोर्टिंग करताना त्रासदायक फोटो दाखवू नये अशा सूचना केल्या आहेत.

अशा प्रकारचे फोटो/ व्हिडिओ दाखवल्याच्या अलीकडच्या काळातील काही घटना :

30.12.2022 रोजी एका अपघात झालेल्या क्रिकेटपटूचे फोटो ब्लर न करताच दाखवले गेले.

06-07-2022 ला बिहारमधील पाटणा येथील एका कोचिंग क्लासरूममध्ये एक शिक्षक 5 वर्षाच्या मुलाला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करताना दिसतो. या व्हिडिओत मध्ये म्यूट न करताच व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये दयेची भीक मागणाऱ्या मुलाचे वेदनादायक रडणे ऐकू येत आहे.

04-06-2022 रोजी एका पंजाबी गायकाच्या मृतदेहाचे रक्तरंजित फोटो ब्लर न करता दाखवले आहेत.

25-05-2022 आसाममधील चिरांग जिल्ह्यात एका व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलांना काठीने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना दर्शवित आहे. व्हिडीओमध्ये हा व्यक्ती मुलांना लाठीने बेदम मारहाण करताना दिसत आहे. ही क्लिप सुद्धा ब्लर न करता आणि म्यूट न करता दाखवण्यात आली आहे ज्यामध्ये ज्यामध्ये मुलांचे वेदनादायक रडणे स्पष्टपणे ऐकू येते.

16-05-2022 ला कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात एका महिला वकिलाला तिच्या शेजाऱ्याने क्रूरपणे मारहाण केली होती, त्याबाबतचा व्हिडिओ नीट एडिट न करताच दाखवण्यात आला.

11-04-2022 रोजी अशीच एक घटना समोर आली ज्यामध्ये केरळमधील एक माणूस त्याच्या 84 वर्षीय आईवर क्रूरपणे हल्ला करताना, त्याच्या आईला अंगणात ओढत मारहाण करताना दिसतो. याबाबतचा जवळपास १२ मिनिटांचा व्हिडिओ सुद्धा ब्लर न करताच दाखवला गेलाय.