मृतदेहाचे गूढ उकलले : अंगावरील दागिण्यांसाठी बेपत्ता महिलेची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
भाजपाच्या माजी आमदार कांता नलावडे यांच्या बंद बंगल्याच्या आवारात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. महिलेचा खून करून तिचा मृतदेह पुरण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तसेच, अंगावरील दागिन्यांसाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. मंगल शिवाजी शिंदे (रा. संगम माहुली, ता. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

मंगल शिंदे या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे या प्रकरणाचा तपास करत होते. तपासात त्यांना मंगल शिंदे यांचा खून करून मृतदेह माजी आमदार कांता नलवडे यांच्या बंगल्याच्या पाठीमागील आवारात पुरला असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचे गूढ उकलले. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

मंगल शिंदे यांची हत्या करणाऱ्या संशयिताचे नाव देखील निष्पन्न झाले आहे. शिंदे यांच्या गळ्यातील बोरमाळ आणि सोन्याचे डोरले काढून घेतल्यानंतर डोक्यात खोरे मारून संशयिताने त्यांचा खून केला असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. त्याला पकडल्यानंतर आणखी माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

शिंदे यांच्या गळ्यातील बोरमाळ आणि सोन्याचे डोरले आरोपीने काढून घेतले. यानंतर खोरे डोक्यात मारून त्यांचा खून केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. आरोपीला पकडल्यानंतरच यातील आणखी वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.