पुस्तकांच्या दुनियेत | सोनम पोवार, सुमित वाघमारे
“…झुं-झपाक बाईकवर मैत्रिणीला सोबत घेऊन फिरायला आवडतं ना? मग मुळात मैत्रीण पटवण्यासारखं वातावरण पाहिजे. तिला घेऊन फिरण्यासाठी तशी जागा पाहिजे.(आम्ही त्याला कॉलेजात डेमोक्रेटिक प्लेसेस म्हणत असू.) तिची जात कोणती का असेना, धर्म कोणता का असेना, शाकाहारी अथवा मांसाहारी का असेना, लग्न करण्याची मुभा पाहिजे. मुळात आनंदानं जगण्यासारखं, हवं ते करिअर करण्यासारखं झिंगाट वातावरण पाहिजे. जॉब्स पाहिजेत. बिझिनेस करायला माहौल पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैत्रिणीला ‘long drive’ला नेण्यासाठी पेट्रोल स्वस्त पाहिजे, बॉस! तर, हे सगळं राजकारण आहे.”
माझ्या पिढीला राजकारण आणि भारत समजून देण्याची सुरुवात करताना यापेक्षा अधिक उत्तम मांडणी करताच येणार नाही हे नक्की! आणि नेमकं हेच काम करण्यासाठी, संजय आवटे यांनी आपल्या तरुणाईच्या भाषेत लिहिलेलं हे खुसखुशीत आणि सुटसुटीत पुस्तक म्हणजे- We the change, आम्ही भारताचे लोक!
कुणाला देशभक्त आणि कुणाला देशद्रोही म्हणायचं याबद्दलचा एक वाद आपण अगदी अलीकडे पाहिला. अजूनपण अधूनमधून तो चालू असतो. यात आपल्याला कधी एक बाजू बरोबर वाटते, तर कधी दुसरी..आणि कधी कधी साला वीट येतो सगळ्याचा..वाटतं, बस ना यार..च्या मायची काय कटकट लावलीये सारखी! या दोन्ही शब्दांमध्ये “देश” नावाचा जो शब्द आहे, तो मात्र कुणीच समजून घ्यायला नीट तयार नसतं. या पुस्तकातून लेखक आपल्याला आपलाच भारत देश समजावून सांगतात. आपल्याला माहिती असतं, की २८ राज्ये आहेत, १९४७ ला स्वतंत्र झाला, १९५० ला संविधान मिळालं इत्यादी इत्यादी.. पण एवढंच म्हणजे देश असतो का? समजा मी प्रश्न विचारला- तुमच्या कुटुंबाची माहिती सांगा. तर, फक्त आमच्या घरी एवढी जमीन आहे, आणि माझ्या घरात एवढे लोकं राहतात आणि त्यांचा जन्म अमुक अमुक साली झाला, एवढीच माहिती द्याल का तुम्ही? आपल्या कुटुंबाची फक्त मालमत्ता म्हणजे आपलं कुटुंब असतं का? तर नाही! सगळ्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव (प्रत्येकाच्या नाना तऱ्हा!!), त्यांची कामे, त्याचं महत्व, त्यांनी आपल्या घरासाठी केलेलं कष्ट हे सगळं सांगणं म्हणजे कुटुंबाबद्दल माहिती सांगणं! तर मग भारत नावाच्या आपल्या कुटुंबाबद्दल आपल्याला ही माहिती हवीच ना? तर ही आपल्या कुटुंबाची मस्त माहिती खूप रंजकपणे सांगणारं हे पुस्तक आहे.
या पुस्तकात एकूण ३० च्या आसपास छोटे छोटे लेख आहेत. त्यामुळे सगळं पुस्तक एकसलग आणि अनुक्रमाने वाचलंच पाहिजे असं कोणताही बंधन आपल्यावर नाही. पण लेखकाने आपल्याच सोयीसाठी एकूण ६ भागात ते लेख वर्गीकृत केलेत. ते सहा भागांचा आशय असा: १. आयडिया ऑफ इंडिया घडवताना २. आयडिया ऑफ इंडिया बिघडताना ३. गांधी, नेहरू आणि आंबेडकर ५. संघर्ष की राह! ६. अब कि बारी, सिर्फ हमारी!
या पुस्तकातली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट सांगतो जी वाचून मी अक्षरशः उडालोच! नेहरू नावाच्या माणसाने लिहिलेली (तेच ते फाळणी त्यांच्यामुळे झाली असे लोकं म्हणतात ते नेहरू) वाक्ये आहेत ही:
“धर्म आणि राष्ट्रीयत्व हे जीनांना समानार्थी शब्द वाटतात! पण तसे ते नाहीत.”, “फाळणी होताच कामा नये. पण, ती होणे अटळ असेल तर नाहक ‘पाकिस्तान’ आणि ‘अखंड हिंदुस्तान’ अशा घोषणा देत बसण्यात अर्थ नाही. असे प्रश्न अधिक परिपक्वपणे सोडवावे लागतात. मात्र देश एक असो कि दोन, हे नक्कीच आहे- जो देश, धर्माला राष्ट्रीयत्व मानण्याची चूक करेल, त्याच्यावर राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य गमावून बसण्याची वेळ येईल!”
आता बोला! शेजारचा पाकिस्तान पाहतोयच आपण! काय सॉलिड डोकं असेल या माणसाचं! त्याने तेव्हाच सांगितलेलं, धर्मावर आधारित देशाचे काय होणार! अन् म्हणूनच आपला देश सगळ्यांनी मिळून धर्मनिरपेक्ष ठेवला!
असो! तर मित्रांनो, आपण लहानपणापासून म्हणतो की विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकातून विचारांची, माणसांची, संस्कृतीची हि विविधता कळत जाते आणि आपलं भारत हे खूप मोठं कुटुंब आहे हे लक्षात येतं! ही विविधता आणि त्यायोगे आपला भारत, आपलं हे कुटुंब अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक: We the change, आम्ही भारताचे लोकं!
पुस्तक : We the change, आम्ही भारताचे लोक
लेखक : संजय आवटे
प्रकाशक: माइंड अँड मिडिया प्रकाशन, पुणे
किंमत- २०० रुपये (सवलतीत)
इथे विकत घेऊ शकता:
नेहमी आमच्या संपर्कात राहण्यासाठी आणि नवीन लेखाची सूचना मिळवण्यासाठी, Like us on: https://www.facebook.com/pustakanchyaduniyet/
तळटीप:
पुस्तक विकत घेऊन वाचणं हे अतिशय महत्वाचं आहे असं आमचं मत आहे. पुस्तकांचा संग्रह असणं ही नुसती अभिमानाची गोष्ट नसते तर आपल्या आसपासच्या माणसांना, व्यक्तींना त्यांच्या प्रगतीसाठी आपण केलेली मदत असते, यावर आमचा दृढ विश्वास आहे. पुस्तक विकत घेऊन आपण आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी सर्वांगीण विकासाचे पर्यावरण निर्माण करतो, हा बहुतेकांचा अनुभव आहेच. त्यामुळे पुस्तके विकत घ्या, वाचा आणि आपल्याच प्रगतीसाठी हातभार लावा!