हाणामारी भोवली : जिल्हा परिषद शाळेच्या दोन्ही महिला शिक्षिका निलंबित
सातारा | गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन महिला शिक्षिकांमध्ये मारहाणीची घटना घडली होती. दोन्ही महिला शिक्षकांनी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल केलेल्या होत्या. त्यानंतर आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दोन्ही शिक्षिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील भरतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षिका मनीषा भुजबळ व रंजना चौरे या दोन महिला शिक्षिकांमध्ये मारामारीची घटना घडली होती. या घटनेची शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. सातारा पंचायत समितीकडून तात्काळ अहवाल मागविला होता. याबाबत सविस्तर अहवाल शिक्षण विभागाकडून विनय गौडा यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
भरतगाव शाळेत झालेल्या मारहाणीच्या घटनेने भरतगावची बदनामी झाली होती. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचीही बदनामीही झाली. याबाबत भरतगाव ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने दोन्ही शिक्षकांची बदली करा अन्यथा शाळेला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता. दोन महिला शिक्षकांमध्ये शाळेतच झालेली मारहाणीची घटना गंभीर असल्याने श्री. गौडा यांनी दोन्ही शिक्षिकांना निलंबित केले. आहे. त्यामुळे रंजना चौरे यांचे मुख्यालय खटाव, तर मनीषा भुजबळ यांचे मुख्यालय कराड येथे असणार आहे.