परभणी विधानसभा मतदारसंघात विकासाचा मुद्दा भावनिक होणार का ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

परभणी विधानसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. मागील तीस वर्षांपासून पक्षाने हा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे. विरोधी पक्षाने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना हा गड काही उध्वस्त करणं शक्य झालं नाही पण तरीदेखील दरवेळी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून रणनीती आखून शिवसेनेला कोंडी धरायचा प्रयत्न केला जातो. त्याला यावेळी तरी यश मिळतं का ? त्यात भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी कोणती रणनीती अवलंबली जाते, यातुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे चित्र मोठा रंगतदार बनणार आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या वेळी 2 लाख 99 हजार 187 मतदार होते ज्यामध्ये 1 लाख 54 हजार 975 पुरुष तर 1 लाख 44 हजार 211 महिल व अन्य 1 मतदार होता. आता विधानसभाच्या वेळी त्यामध्ये 5 हजार 472 मतांची वाढ झालीय. मागील पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीत आता परभणी विधानसभा मतदारसंघात 20 हजार 215 नवीन मतदारांची वाढ झाली आहे . 302 मतदान बुथ या मतदारसंघात आहेत .

निजाम कालीन जिल्हा अशी परभणी जिल्ह्याची ओळख. त्यात संवेदनशील ठिकाण म्हणून परभणीची राज्यात ओळख. सुरवातीच्या काळामध्ये शेकाप काँग्रेस या पक्षांनी या ठिकाणच्या विधानसभेवर अधिराज्य गाजवलं . नव्वदच्या दशकानंतर शिवसेनेच्या आगमनाने परभणीची विधानसभा जागा कायमस्वरूपी त्यांना आंदण दिल्यासारखे चित्र निर्माण झालं. शिवसेनेच्या पहिल्या निवडणुकीपासून आज तागायत विधानसभेवर भगवा कायम राहिला आहे .उमेदवार कोणीही असो शिवसेना आपला गड कायम राखते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी मधून हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. दरवेळी परभणी मतदार संघाने शिवसेनेलाच आपला कौल दिला. विरोधी पक्षाने आखलेल्या रणनीती मधून अगदी अलगत शिवसेनेने दरवेळी आपली सुटका करून घेतली.

परंतु मागील निवडणुकीमध्ये मित्र पक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला कारण म्हणजे भाजपला शिवसेनेच्या सर्वच गणिते चांगलेच माहीत आहेत. याचा एकूण परिणाम भाजपने आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये आनंद भरोसे यांच्या रुपाने 40 हजारावर मते मिळवली. यामुळे यावेळच्या विधानसभेमध्ये नेमकी काय चित्र समोर येते या विषयी शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. तर्कवितर्कांना ही मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे . शिवसेनेकडून विद्यमान आमदार राहुल पाटील हेच उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट दिसते. तर काँग्रेस मधून जवळपास सोळा जणांनी विधानसभेच्या साठी मुलाखती दिल्या आहेत. त्यात सुरेश नागरे यांचे नाव पुढे असुन जुन्या नेत्यांचा त्यांना उमेदवारी देण्यास विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी नागरे यांना उमेदवारी मिळाल्यास सहकार्य मिळणार नाही असे जाहीर केले आहे . नागरे यांना सोडून स्थानिक इच्छूक काँग्रेस नेत्यास उमेदवारी द्यावी असा दबाव पक्षनिरक्षकांकडे त्यांनी टाकलाय . राज्यस्तरावर आघाडी झाल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार नाही.तर दुसरीकडे भाजपचा एकला चलो रे चालणारा अधून मधून बाहेर येतो. त्यानुसार भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी यावेळी देखील निवडणुकीची तयारी केलीये. युती तुटली तर पारंपारिक विरोधक म्हणून शिवसेना काँग्रेस ऐवजी शिवसेना आणि भाजप असा सामना परभणीतून पाहायला मिळू शकतो. हिंदुत्वाच्या जिवावर दरवेळी शिवसेना परभणी मतदार संघ जिंकते परंतु त्यास हिंदुत्वाला सेंद लागल्याने भाजपा देखील आता आपला ठराविक शेअर घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. खरं चित्र युती होणार की नाही यावरच अवलंबून आहे. विशेष म्हणजे वंचित आघाडीचा ही या निवडणुकीला चांगलाच परिणाम होणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्यावेळी परभणी मतदारसंघातून वंचित ने चांगलीच भरारी मारली होती. त्यामुळे पक्षांकडून कोण मैदानात उतरतो यावरच निवडणुकांचे चित्र अवलंबून आहे.

जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघ प्रमाणेच याही मतदारसंघांमध्ये विकासाचा वानवाच आहे .ग्रामीण भागामध्ये रस्ते, आरोग्यसुविधा त्याबरोबरच बहुतांश शेतकरी यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव, शेती प्रक्रिया उद्योग नसल्याने आजही ग्रामीण भागाची परिस्थिती जैसे थे आहे. शहरांमध्ये अंतर्गत रस्ते, शहर बायपास रस्ता सारखे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग नसल्याने स्थानिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे राज्यातील मोठ्या शहरांकडे काम करण्यासाठी जाण्याशिवाय स्थानिकांना पर्याय नाही. एकंदरीत जिल्ह्या सोबतच याही मतदारसंघांमध्ये विकास हा मुद्दा गोण राहिल्याने याही मतदार संघाचा विकास म्हणावा तेवढा झाला नाही. दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने. ४ ऑक्टोबर नंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सोबतच तिरंगी लढत येथे पहायला मिळेल यात शंका नाही .

Leave a Comment