शरद पवारांची कोरोनाशी तुलना करणे पडळकरांना पडणार महागात; होणार ‘ही’ कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची करोना विषाणूशी तुलना केल्याने भाजपचे आमदार व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सरकारनेही हे विधान गंभीरपणे घेत पडळकर यांच्यावर पोलीस कारवाईचे संकेत दिले आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप तपासा, असे आदेश राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत. पडळकर यांनी केलेलं विधान तपासून ते आक्षेपार्ह आढळलं तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पडळकर याच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे.

शरद पवार यांच्यावरील टीका निषेधार्ह आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. राज्यातील व देशातील कोणताही स्वाभिमानी माणूस पवार यांच्यावरील टीका सहन करणार नाही. काल आमदार झालेल्या व्यक्तीने बेजबाबदारपणे अशी टीका करणे योग्य नाही. याचे परिणाम त्यांना महाराष्ट्रात फिरताना दिसू लागतील, असेही देसाई म्हणाले. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी शरद पवार यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीवर प्रमुख म्हणून बोलावले होते. सातत्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊनच पवार यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काम केलं. अशा आदर्श नेत्यावर नवख्या आमदाराने टीका करणे अशोभनीय आहे, असेही देसाई म्हणाले.

काय म्हणाले होते पडळकर?

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला आहे. छोट्या समूहाला भडकवायचं आणि लढवायचं हेच धोरण त्यांनी नेहमी राबवलं आहे. त्यांनी ६० वर्षे बहुजन समाजाला झुलवत ठेवून राज्य केलं आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांत त्यांनी बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ दिले नाही, असा आरोप करत पवारांकडे विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली तर भाजप नेत्यांनी हात वर केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना फोन करून खरमरीत शब्दांत सुनावले. शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत मात्र, ते आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणे चुकीचे आहे, असे फडणवीस यांनी पडळकरांना सांगितले. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनीही पडळकर यांच्या विधानाशी पक्ष सहमत नसल्याचे स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment