भीमा – कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भीमा कोरेगाव प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी चौकशी आयोगाकडे केली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी करण्यात यावी यासाठी त्यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे, अशी मागणी मी तपास आयोगाकडे केली आहे. फडणवीस यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात कारवाईसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, असं लाखे पाटील यांनी सांगितलं.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विशेष चौकशी पथक स्थापन त्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले होते. कोरेगाव-भीमा प्रकरणात फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केला. माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. पोलिसांना हाताशी धरून घडविलेले ते एक षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचाच सगळा डाव होता. पोलिसांनी या प्रकरणात बहुतेक पुरावे तोडून-मोडून सादर केले, असा गंभीर आरोप पवारांनी केला आहे. पवार यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली असतानाच, केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास अचानक एनआयएकडे दिला. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

कोरेगाव-भीमा तपास संशयाच्या भोवऱ्यात!

दरम्यान, एल्गार प्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवल्यानंतर त्यांचे एक पथक सोमवारीच पुण्यात दाखल झाले. या गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रे ताब्यात घेण्याबाबत पुणे पोलिसांशी चर्चाही केली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील एक पत्र पुणे पोलिसांकडे दिल्याचे सांगितलं जातं.