CAA,NRC विरोधात शरद पवार, प्रकाश आंबेडकर एकत्र; यशवंत सिन्हांच्या नेतृत्वात गांधी शांतता यात्रेला प्रारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | CAA, NRC आणि NPR च्या विरोधात आयोजित केलेल्या गांधी शांतता यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकत्र आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस एकमेकांवर गंभीर आरोप करणारे हे दोन दिग्गज नेते या निमित्ताने एकत्र आले आहेत. या निमित्ताने दोघांनीही मनोगत व्यक्त करत गांधी शांतता यात्रेला पाठींबा दिला.

शरद पवार म्हणाले, CAA, NRC विरोधात या देशातील नवीन पिढी शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरत आहे. मात्र हे सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जेएनयूत झालेल्या हिंसाचारामुळे देशातील तरुणांच्या मनाला ठेच पोहचली आहे. देशभरात या घटनेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या विरोधात गांधीजींच्या मार्गानेच आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ही लढाई मोठी आहे सहजासहजी सरकार ऐकेल असं वाटत नाही. हे एका प्रकारचे युद्धच आहे. हा राजकीय लढा आहे. शांततेच्या मार्गानेच हा लढा लढावा लागेल. आपण संविधानासाठी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या अजेंड्यासाठी लढत आहे.

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली  गेट वे ऑफ इंडिया ते महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ राजघाट अशी ही यात्रा असणार आहे. ही यात्रा 6 राज्यातून जाणार आहे. मुंबईत आज गेट ऑफ इंडिया येथे या यात्रेचा प्रारंभ झाला. या प्रसंगी यशवंत सिन्हा, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मंत्री नवाब मलिक, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.

Leave a Comment