मोदींच्या जनता कर्फ्यूला संघाची बगल; उद्या शाखा भरणारच, पण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधत रविवारी मोदींनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी२२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. सकाळी ७ ते रात्री ९ असे १४ तास जनता कर्फ्यू पाळला जावा, असं मोदींनी म्हटलं आहे. मात्र, मोदींच्या आवाहनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बगल दिल्याचं दिसून येत आहे. उद्या जनता कर्फ्यूच्या दिवशी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा नियमित सुरूच राहणार असून संघाच्या शाखांची वेळ मात्र, बदलवा अशी सूचना संघानं ट्विटरवरुन दिली.

संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हवाल्यानं करण्यात आलेल्या या ट्विटनुसार, रविवारी होऊ घातलेला जनता कर्फ्यूचा वेळ पाहता, सकाळी साडे सहाच्या आधी किंवा रात्री साडे नऊच्या नंतर शाखा सुरू होईल, असं आरएसएसनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटलं आहे. ”माननीय पंतप्रधानांचं २२ मार्चचं जनता कर्फ्यूचं आवाहन लक्षात घेता त्या दिवशी शाखा सकाळी साडे सहाच्या आधी किंवा रात्री ९.३० च्या नंतर होतील. आपापल्या विभागात, मोहल्ल्यात किंवा सोसायटीत काही स्वयंसेवक एकत्र येऊन प्रार्थना करू शकतात,” असं संघानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या १४ तासांच्या जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. याचसोबत रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराबाहेर येऊन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी टाळ्या वाजवत कौतुक करण्याचं आवाहनही मोदींनी केलं. रेल्वेने रविवारी देशभरातील जवळपास ३,७०० रेल्वेगाड्या रद्द केल्यानंतर आता देशातील इंडिगो आणि गोएअर या मोठ्या कंपन्यांनीही जवळपास तब्बल १ हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिक लोकांनी घरात रहावं यासाठी मुंबई मेट्रोनेही रविवारी आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातही करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकार मुंबई लोकल शट डाऊन करण्याचा विचार करत असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment