कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त!! आरोग्यमंत्र्यांनी निश्चित केले नवे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. 4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी 1400 रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट आणत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान, करोना चाचण्यांचे दर अधिक असल्याने अनेक रुग्णांची कुचंबणा होत होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकार सातत्याने हे दर कमी करत आहे. आतापर्यंत चारवेळा करोना चाचण्याचे दर कमी करण्यात आले आहेत. आता किमान ९८० रुपयांत खासगी प्रयोगशाळेत करोना चाचणी होणार असल्याने त्याचा दुहेरी फायदा होणार आहे. करोना सदृष्य लक्षणे असलेले अनेक रुग्ण चाचण्यांसाठी पुढे येतील व त्यातून चाचण्यांची संख्या वाढून उपचारांची व्याप्ती वाढवणे शक्य होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment