मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांनी टाकली गुगली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी । काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा अद्याप सुरु आहे. वाटाघाटी प्राथमिक टप्प्यात आहेत. मुख्यमंत्रिपदाची मागणी कोणाची असेल, तर त्याचा विचार नक्की करावा लागेल, असं उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. नागपुरात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पवार गेले होते, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच मिळणार असल्याचं वारंवार सांगितलेलं असताना शरद पवारांनी केलेलं वक्तव्य आश्चर्यचकित करणारं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांचे विचार सरकारचा चालवताना धर्मनिरपेक्ष आहेत. याचा अर्थ आम्ही हिंदू, मुस्लिम अशा कुठल्या समाजाच्या विरोधात आहोत, असा होत नसल्याचं सांगत, हिंदुत्ववादाचा मुद्दा उचलून धरणाऱ्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कसं जुळवून घेणार, हा प्रश्न पवारांनी खोडून काढला.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा झाली. मी त्या बैठकांना उपस्थित नसल्यामुळे मला तपशीलवार माहिती नाही. किमान सामायिक धोरणावर चर्चा सुरु आहे. सर्वमान्यता झाल्यानंतरच आराखडा करण्यात येईल, असं पवारांनी स्पष्ट केलं. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, केसी वेणुगोपाल दिल्लीहून आले होते. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. दोन-तीन दिवसांनी पुन्हा दिल्लीला बैठक घेण्याचं त्यांनी सांगितलं, असंही पवार म्हणाले. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रितपणे राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याचं मला माहिती नाही, मात्र राष्ट्रवादीकडून उद्याची वेळ मागण्यात आली आहे, असंही पवार म्हणाले.

Leave a Comment