एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या बाबतीत शिवसेना उतावीळ !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर प्रतिनिधी | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा जोरावर आहेत, मात्र अधिकृत पक्षप्रवेशापूर्वीच शिवसेना कार्यकर्त्यांचा उतावीळपणा पाहायला मिळत आहे. मुंबई जवळच्या नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला आहे. नालासोपारा विधानासभा मतदारसंघातून प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र अद्याप त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झालेला नाही.

परंतु नालासोपारा मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरु झाली आहे. दहीहंडी उत्सव, गणपती उत्सव यांची तयारी सध्या जोरात सुरु आहे. या ठिकाणी भावी आमदार प्रदीप शर्मा असे बॅनर लागले आहेत. तसेच शर्मा यांचे फोटो असलेल्या 20 हजारांहून अधिक टीशर्ट्सचंही वाटप करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे कोकण वासियांना गणपती दर्शनासाठी 100 रुपयांत बसेस देखील उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यावरही प्रदीप शर्मा यांना सौजन्य देण्यात आलं आहे. त्यामुळे शर्मांच्या पक्षप्रवेशापूर्वीच प्रचार यंत्रणा सज्ज झाली आहे. एकीकडे, शिवसेना आणि भाजप ‘आमचं ठरलंय’ सांगत विधानसभा निवडणुकीला युतीत सामोरं जाणार असल्याचं सांगत आहेत. मात्र दोन्ही पक्षांकडून स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरु असल्यामुळे ‘नेमकं काय ठरलं आहे’ असा प्रश्नही मतदारांना पडला आहे.

प्रदीप शर्मा हे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. निवृत्तीपूर्वीच 4 जुलैला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचा अर्ज केला होता. व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे कारण शर्मा यांनी दिलं होतं. त्यामुळे प्रदीप शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची अटकळ बांधली जात होती. सुरुवातीला प्रदीप शर्मा यांना पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होती. मात्र अचानक शर्मा शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना तोंड फुटलं. प्रदीप शर्मांसाठी अंधेरी, चांदिवली किंवा नालासोपारा या तीन मतदारसंघांची चाचपणी केली जात होती, असं बोललं जातं.

Leave a Comment