नाशिक कारागृहातील कैद्याने जोपासली अनोखी कला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी । एखादी लहान चूक आयुष्यात आपल्या हातून नकळत घडते..आणि तोच गुन्हा ठरून आयुष्यभर शिक्षा भोगावी लागते. लहान मोठ्या चुका झाल्याने कैदीच्या रूपात अनेकांचे आयुष्य अंधार कोठडीत वाया गेले. मात्र चार भिंतींच्या आड कारागृहात हे कैदी काय करतात. त्यांच्या आवडी-निवडी ते कशा जोपासतात या कैद्यांमधे लपलेल्या कलाकाराचा आविष्कार याच काळकोठडीत बघायला मिळतो. काळकोठडीत शिक्षा भोगत असलेल्या एका  कैद्याने बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या गणेशोत्सवाचा एक वेगळाच अनुभव कैदी आणि अधिकाऱ्यांना येत आहे. जो अनुभव अधिकाऱ्यांच्या मनाला समाधान देणारा तर कैद्यांना काही चांगलं करून दाखवण्याची जिद्द देणारा आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा सागर पवार हा त्यापैकी एक कैदी. सागर पेण मधील गणपती बनविणारा कारागीर आहे. आपल्या कलेला वाव मिळावा म्हणून त्यांने जेल प्रशासनाला विनंती करून जेलमध्येच अत्यंत सुबक अशा शाडूमातीचे गणपती बनविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. अर्थात विनंती केल्यानंतर जेलर साहेबांनी त्याला गणपती बनविण्यासाठीच सामान उपलब्ध करून दिलं आणि सागर ने देखील जन्माने कोणी गुन्हेगार नसतो हे सिद्ध करत आपण सुद्धा एक चांगली व्यक्ती बनू शकतो याचा आदर्शच इतर कैद्यांसमोर ठेवला आहे. अत्यंत सुबक आणि आकर्षक दिसणाऱ्या या गणेशमूर्ती सागर ने कुठल्याही साचाचा वापर न करता हातानेच बनविल्या आहेत. या मूर्तींची जेल प्रशासन येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात विक्री करणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून सागर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात अत्यंत सुंदर अशा गणेश मूर्ती बनवत आहे. आपल्या सोबतच्या कैद्यांना देखील त्याने या कलेचे प्रशिक्षण दिले आहे.

यंदाच्या वर्षी देखील जवळपास पाच ते सहा महिन्यांपासून सागरने इतर कैद्यांच्या मदतीने जवळपास आठशे मूर्ती बनवल्या आहेत. सागरने बनवलेल्या गणेश मूर्तींना संपूर्ण राज्यातून मागणी आहे. यावर्षी सागरने जवळपास 12 फुटाची भव्य गणेश मूर्ती विशेषतः तयार केली आहे. या सर्व मूर्ती नाशिक मध्यवर्ती कारागृह बाहेर असलेल्या एका हॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच इतर वस्तूंचे देखील प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते झाले.

Leave a Comment