सांगलीत पूरग्रस्तांसाठी ३१ ऑगस्टला मोर्चा : माजी खा.राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी| महापूरामुळे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश देण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. पूरग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या मागणीसाठी ३१ ऑगष्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्या चौकशीबाबत बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले कि, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. अनेक घोटाळे सत्ताधाऱ्यांचे त्यांनी बाहेर काढले होते. ईव्हीएम यंत्रातील गडबडीवरही त्यांनी आवाज उठविला होता. राज ठाकरेंनी सरकारला अडचणीतच आणले होते. म्हणूनच त्यांना शांत करण्यासाठीच ईडीच्या नोटीसा बजावल्या आहेत, अशी टीका माजी खा. राजू शेट्टी केली.

कोहिनूर स्क्वेअर प्रकरण वीस वर्षापूर्वीचे आहे. तसेच भाजप सरकार सत्तेवर येऊन पाच वर्षे झाली आहेत. या कालावधी त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती. आताच त्यांना नोटीस का पाठविले. या मागे एकमेव राजकीय षड्यंत्रच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे एकरी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासन वीस हजाराची मदत करुन त्यांचे नुकसान भरुन येणार नाही. घराची पडझड झाली आहे. यासाठी प्रमुख मागण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे, असेही माजी खा. शेट्टी यांनी सांगितले.

Leave a Comment