सातारा जिल्ह्यातील गावागावांत झळकतायंत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे बॅनर्स; 2024 च्या निवडणुकीसाठी मोठा डाव??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । अक्षय पाटील
2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा चुरशीचा सामना महाराष्ट्रात आहे. असे असतानाच आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने सुद्धा महाराष्ट्रात एन्ट्री मारली आहे. याचाच भाग म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील गावागावांत BRS चे बॅनर्स झळकत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

गावागावांत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे बॅनर?

सध्याच्या ऑनलाइनच्या जमान्यात नव्या राजकीय पक्षांची जाहिरात टीव्ही, सोशल मीडियात पहिल्यांदा पाहायला मिळते. मात्र भारत राष्ट्र समितीने थेट गावागावात बॅनर्स लावून रिक्षा फिरवून आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक लहान सहान खेडेगावांत BRS पक्षाने लोकांमध्ये फिरून आपल्या प्रचाराची सुरवात केली आहे. आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत असणाऱ्या मनसेला ज्या खेडोपाड्यांत पोहोचता आले नाही तिथे बाहेरच्या राज्यात उगम पावलेल्या BRS ने मजल मारली असल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

BRS च्या बॅनर्सवर शाहू, फुले, आंबेडकरांचे फोटो

सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात चंद्रशेखर राव यांचे बनर्स आणि पोस्टर पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि शिवशाहीर अण्णाभाऊ साठे अशा थोर व्यक्तींचे फोटो पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा मानला जातो, त्यामुळे याच थोर व्यक्तींचे फोटो चंद्रशेखर राव यांच्याही बॅनर्सवर असल्याने महाराष्ट्राचा आणि येथील राजकारणाचा संपूर्ण अभ्यास चंद्रशेखर राव यांनी केल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच यातून BRS ने आपली वैचारिक भूमिकाही लोकांसमोर मांडली आहे.

अबकी बार किसान सरकारचा नारा

सातारा जिल्ह्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी आपल्या बॅनर्सवर तेलंगणात शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख केला आहे. तसेच राजेशाही संपली परंतु राजे काही संपले नाहीत..किसान सरकार शिवाय कोणताही पर्याय नाही त्यामुळे अबकी बार किसान सरकार असा नारा राव यांच्याकडुन देण्यात आला आहे. राव यांनी तेलंगणामध्ये अनेक शेती उपयोगी योजना सुरु केल्याने त्यांना शेतकरी वर्गातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात नव्या पक्षाची एंट्री –

खरं तर सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्याने पक्षाला भरभुरून प्रेम दिले, मते दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आणि खासदार मोठ्या संख्येने साताऱ्यातून निवडून आले. अशावेळी चंद्रशेखर राव यांचे साताऱ्यातील बनर्स म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वालाच धक्का देण्याचा चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.

साताऱ्यातील बडा नेता चंद्रशेखर राव यांच्या गळाला??

सातारा जिल्ह्यात खेड्यापाड्यात ज्याप्रकारे चंद्रशेखर राव यांचे बनर्स झळकत आहेत ते पाहता यामागे कोणाचा वरदहस्त आहे का अशी चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील कोणी बडा नेता चंद्रशेखर राव यांच्या गळाला तर लागला नाही ना? याबाबत चर्चा रंगली आहे. रस्त्यांकडेला लागलेला मोठे होर्डिंग्स असोत किंवा गावागावात टपऱ्यांवर अन भितींवर चिटकवलेले पोस्टर्स असो, हे सर्व पाहता कोणी मोठा नेता यामागे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

राज्यातील जनतेला नवा राजकीय पर्याय हवाय?

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप हे 4 प्रमुख पक्ष मानले जातात. त्यात आता एकनाथ शिंदे यांच्या मुळे शिवसेनेतच 2 गट पडलेत. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही मर्यादा आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनाही ठराविक जिल्ह्यापुरत्या मर्यादित आहे. त्यातच गेल्या 4 वर्षात महाराष्ट्रचे राजकारण ज्याप्रमाणे बदलत गेलंय ते पाहता राज्यातील जनताही या सर्व राजकीय पक्षांना कंटाळून नव्या पर्यायांच्या शोधात असू शकते.

चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाच्या जनतेसाठी कोणकोणत्या मुख्य योजना राबविल्या

1) प्रत्येक शेतकऱ्यास शेती खर्चासाठी प्रतिवर्षी प्रति एकर 10 हजार रुपयांची मदत

2) शेतीसाठी 24 तास योग्य दाबाची मोफत सोय

3) खरेदी केंद्रावर शेत मालाची हमी भावाने खरेदी

4) प्रत्येक शेतकऱ्याला 5 लाखांचा जीवन विमा

5) अनेक निवासी गुरुकुल विद्यालये, उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्काची सरकारतर्फे फी परिपूर्ती योजना

6) दलित कुटुंब उद्योग- व्यवसायासाठी 10 लाख रुपये