हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bulandshahr Jail) आज पर्यंत तुम्ही अनेक भुताखेताच्या गोष्टी ऐकल्या असतील. कधी खवीस, कधी चेटकीण तर कधी पांढऱ्या साडीतल्या भुताच्या गोष्टी अक्षरशः घाम काढतात. पण भारतात एक असं ठिकाण आहे जिथे गेल्या २१ वर्षांपासून भुतांच्या नुसत्या गोष्टी ऐकवल्या जात नाहीत तर इथे आत्मे भटकतात असे सांगितले जाते.
भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर या ठिकाणी इतिहासातील एक असे कारागृह आहे जिथे भुतांचा वावर असल्याचं स्थानिक लोक सांगतात. या कारणामुळे गेल्या २१ वर्षांपासून हे कारागृह बंद ठेवण्यात आले आहे. चला तर या भूतांच्या कारागृहाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
स्वातंत्र्य चळवळीची साक्ष देणारे बंद कारागृह (Bulandshahr Jail)
बुलंद शहरातील हे जुने कारागृह अत्यंत गूढमय आहे. गेल्या २१ वर्षांपासून इथे भुताटकीचे विविध प्रकार घडत असल्याचे स्थायिक लोक सांगतात. या तुरुंगाची स्थापना १८३५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. या ठिकाणी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना फाशी दिली गेली. दिवंगत बाबू बनारसीदास, यूपीचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य चळवळीत एकेकाळी तुरुंगात गेलेले अनेक स्वातंत्र्यसैनिक इथे ब्रिटिशांकडून छळले गेले. अशा या कारागृहाला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा इतिहास आहे. मात्र आज हे कारागृह भग्नावस्थेत बंद आहे.
वटवृक्षाला लटकवून द्यायचे फाशी
या कारागृहाला १९४७ च्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे. (Bulandshahr Jail) या ठिकाणी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना इंग्रजांचा छळ सहन करावा लागला होता. त्यावेळी येथे स्वातंत्र्य सैनिकांना एकाकी बराकीत ठेवण्यात आले होते. विद्रोह, आक्रोश आणि क्रूरपणाची साक्ष देणारे हे कारागृह आज बंद आहे. मात्र ही वास्तू भूतकाळातील घटनांची आजही साक्ष देते. त्या काळी या तुरुंगात वटवृक्षाला लटकवून लोकांना फाशी दिली जायची.
कोर्टातून फाशीच्या शिक्षेचा निर्णय आला की येथील कैद्यांना कारागृहाच्या मध्यभागी बोलावले जायचे. (Bulandshahr Jail) यानंतर इतर सर्व कैद्यांसमोर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्याला सुळावर दिले जायचे. यावेळी इतर कैदी ओरडायचे, आक्रोश करायचे तर जल्लाद क्रूरपणे हसायचा. हे आवाज आजही या कारागृहात घुमतात, असे स्थायिक सांगतात. या कारागृहात १००० हून अधिक स्वातंत्र्य सैनिकांना सुळावर चढवून फाशी देण्यात आली होती. ज्या वटवृक्षाला फाशी दिली जायची तो २०० वर्ष जुना वटवृक्ष आजही या तुरुंगात आहे.
१८७ वर्ष जुना तुरुंग
बुलंद शहरातील हा भयानक तुरुंग १८७ वर्ष जुना असल्याचे अनेक जाणकार सांगतात. त्याकाळी या तुरुंगाच्या आवारात अनेक झाडे सुशोभीकरणासाठी लावण्यात आली होती. आज तीच झाडे अत्यंत भव्य झाली असून त्यांची मजबूत मुळे भयावह चित्र निर्माण करतात. (Bulandshahr Jail) त्याकाळी लावण्यात आलेली ही झाडं आज १५० ते २०० वर्ष जुनी झाल्याने अत्यंत मजबूत झाली आहेत. भुताटकीच्या गोष्टींमुळे कारागृहाची स्वच्छता करण्यास कुणीही पुढे येत नसल्याने कारागृहाभोवतालच्या परिसरात अशी अनेक झाडं वाढत आहेत.
कैद्यांची विहीर
या कारागृहात कैद्यांना पाणी पिण्यासाठी एक विहीर होती. या विहिरीत बादली टाकून पाणी काढले जायचे आणि तुरुंगातील कैदी या पाण्याने आपली तहान भागवायचे. आजही या तुरुंगात ही विहीर आहे. मात्र आता ही विहीर पडकी झाली असून तिला पाणी लागत नाही. मात्र तिचं रुपडं अगदी काळजात धडकी भरवेल असे आहे.
कारागृहातील शिव मंदिर
या कारागृहात हिंदू देवता महादेवाचे मंदिर आहे. (Bulandshahr Jail) असे सांगतात की, पूर्वी या कारागृहातील कैदी त्यांच्या सुटकेसाठी भगवान शिवाची प्रार्थना करत असत. या मंदिरात नियमितपणे हे कैदी भगवान शंकराची पूजा करत आणि दिवा देखील लावत. मात्र, आज या शिवमंदिरात दिवा लावायला कोणीच नाही. त्यामुळे हे शिवमंदिर देखील धुळीने माखले आहे.