हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bullet Train । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या बुलेट ट्रेनचे पहिले स्टेशन तयार झालेलं आहे. सुरत येथे हे स्टेशन उभारण्यात आलं आहे. गृह, उद्योग, वाहतूक, युवा आणि क्रीडा राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. या बुलेट ट्रेनचे टेस्टिंग पुढील वर्षी सुरू होईल आणि २०२९ पर्यंत पूर्ण सेवा अपेक्षित आहे असे ट्विट त्यांनी केले.
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये जलद कनेक्टिव्हिटीसाठी आहे. बुलेट ट्रेनचा (Bullet Train) हा कॉरिडोर एकूण 508 किलोमीटर लांब असून तो महाराष्ट्राच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), ठाणे, विरार आणि बोइसर पासून सुरु होऊन गुजरातच्या वापी, सूरत, वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमतीपर्यंत जातो. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर आत्तापर्यंत ३०० किलोमीटर लांबीचा व्हायाडक्ट बांधण्यात आला आहे. व्हायाडक्ट ही एक उंच पुलसारखी रचना आहे जी रस्ते, नद्या आणि इतर अडथळ्यांना मात देऊन पुढे जाते. या ३०० किमी पैकी २५७.४ किमी लांबीचे बांधकाम स्पॅन लाँचिंग तंत्र वापरून केले गेले आहे. हे तंत्रज्ञान पारंपारिक पद्धतींपेक्षा १० पट वेगाने काम करते.
बुलेट ट्रेनचा सर्वाधिक प्रवास हा गुजरात मध्ये- Bullet Train
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा सर्वाधिक प्रवास हा गुजरात मध्ये आहे. गुजरातमधील बुलेट ट्रेनचा मार्ग हा जवळपास 348 किलोमीटर लांबीचा आहे. तर महाराष्ट्रातून जाणारा बुलेट ट्रेनचा मार्ग हा 156 किलोमीटर लांबीचा आहे. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम अतिशय वेगवान पद्धतीने सुरु आहे. त्यामुळे तिथेच गुजरातमधील मार्गावरूनच पहिल्यांदा बुलेट ट्रेन चालवली जाईल अशी शक्यता आहे, मीडिया रिपोर्ट्सनुसार गुजरातच्या साबरमती पासून ते वापी यामध्ये बुलेट ट्रेन 2028 पासून सुरु आहे. अहमदाबाद ते मुंबई असा पूर्ण बुलेट ट्रेनचा मार्ग 2030 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.