औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात आठ आगार बस स्थानके आहेत. मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातून गेल्या काही दिवसांपासून दिवसभरात दहा ते बारा बस धावत आहेत. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व बसस्थानके अद्यापही बंदच आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद सिडको, मध्यवर्ती बस स्थानक, पैठण, सोयगाव, गंगापूर, सिल्लोड, वैजापूर, कन्नड या तालुक्याच्या ठिकाणी एसटीचे आगार आहेत. या आगारांमध्ये औरंगाबाद विभागात एकूण 536 बस गाड्यांचा ताफा आहे. एसटीचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील एसटी कर्मचारी आठ नोव्हेंबर पासून संपावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 536 एसटी बसेसची चाके सध्या आगारातच रुतली आहेत. जिल्ह्यातील सोयगाव, गंगापूर, सिल्लोड, वैजापूर, कन्नड हे आगार काल दुपारपर्यंत बंद होते. मात्र पैठण, सिडको आणि मध्यवर्ती बस स्थानक के काही प्रमाणात सुरू होती. काल सायंकाळी सात वाजेपर्यंत 14 शिवशाही आणि 13 साध्या बस धावल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ग्रामीण भागातील एसटीची सेवा बंद असल्याने प्रवाशांची सध्या प्रचंड गैरसोय होत आहे. काही केल्या संप मिळत नसल्याने आता प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील आगार आणि बसची संख्या –
सिडको बसस्थानक – 90
मध्यवर्ती बस स्थानक – 144
पैठण – 62
सिल्लोड – 58
वैजापूर – 53
कन्नड – 45
गंगापूर – 48
सोयगाव – 36
एकुण – 536