मराठा आंदोलन पुन्हा पेटलं!! जालन्यात बस जाळल्याची घटना, 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) पुन्हा एकदा पेटलेले दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्यानंतर जालना-घनसावंगी तालुक्याच्या तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट, मेसेजमुळे प्रशासनाने हे ठोस पाऊल झालेली आहे.

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे परिवहन महामंडळाची बस पेटवण्यात आली आहे. ही बस अंबड- रामसगाव मुक्काम करून परत येत होती. त्याचवेळी तीर्थपुरी या गावात आंदोलन सुरू होते. यातीलच काही आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही अज्ञातांनी थेट बसच पेटवून दिली. या घटनेनंतर गावामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पोलीस आरोपींवर गुन्हा नोंदवण्याची प्रकिया करत आहेत.

मुख्य म्हणजे, बस पेटवून दिल्याची घटना घडल्यानंतर राज्य परिवहन मंडळाने जालना जिल्ह्यातील एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जालना जिल्ह्यात जाणाऱ्या पाच आगरांच्या बस बंद आहेत. आता पोलिसांचे आदेश येईपर्यंत ही बस सेवा बंदच राहणार आहे. तसेच, पैठण- संभाजीनगर येथील बस सेवा देखील बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्यामुळे ऑनलाइन कामे खोळंबली आहेत. हे सर्व परिणाम राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे होत असताना देखील सरकार यावर ठोस भूमिका घेताना दिसत नाही.