CAA Law : CAA कायद्यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार? अमित शहांनी स्पष्टच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने संपूर्ण देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA Law) लागू केला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर अनेक समूदायात संभ्रम निर्माण झाला आहे. देशातील विरोधी पक्षांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व चर्चांवर उत्तरे देत म्हंटल कि CAA कायद्यामुळे कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. तसेच हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही असेही अमित शाह (Amit Shah) यांनी स्पष्ट केलं.

अल्पसंख्याकांना घाबरण्याची गरज नाही- CAA Law

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शाह यांनी सीएएवर भाष्य करत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. भाजपने 2019 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की ते CAA कायदा लागू केला जाईल. परंतु कोविडमुळे त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली . देशातील अल्पसंख्याकांना घाबरण्याची गरज नाही कारण आम्ही कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही असं म्हणत अमित शाह यांनी मुस्लिम समाजाला आश्वस्त केलं. पाकिस्तान , बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार झालेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह बिगर मुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देणे हा सीएएचा उद्देश आहे असे अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

आम्ही CAA कायदा (CAA Law) कधीही मागे घेणार नाही असेही अमित शाह यांनी सांगितलं. देशातील विरोधकांनी म्हंटल आहे कि आम्ही सत्तेत आल्यानंतर CAA कायदा मागे घेऊ, याबाबत अमित शाह याना विचारलं असता त्यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली. विरोधकांना माहित आहे कि ते पुन्हा कधीच सत्तेत येणार नाहीत. आणि राहिला प्रश्न कायदा रद्द करण्याचा.. तर CAA कायदा कधीही रद्द होणार नाही. आम्ही देशभर CAA कायद्याबाबत जनजागृती करू आणि लोकांना त्याबाबत पटवून देऊ असेही अमित शाह यांनी म्हंटल.