Tuesday, February 7, 2023

कोरेगावात राष्ट्रवादीच्या गडाला मोठं खिंडार; शिंदे गटाचाच बोलबाला

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतमोजणी पार पडली. सातारा जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुकीत कोरेगाव तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला मोठे खिंडार पाडले. कोरेगाव तालुक्यात शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाने 51 पैकी 34 जागांवर मोठा विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या मतदारसंघातील महत्वाच्या ग्रामपंचायतींवर एकनाथ शिंदे गटाने ग्रामपंचायत निवडणुकीतून सत्ता स्थापन केली आहे. कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे व शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटात ‘काट्टे कि टक्कर’ पहायला मिळाली. या ठिकाणी दोन्ही शिंदेंकडून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठ्या ग्रामपंचायतीत धोबीपछाड दिली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली आणि देगाव ग्रामपंचायत येते. ही दोन्हीही गावे मोठी असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. या ठिकाणी आमदार महेश शिंदे गटाची सत्ता आली असल्यामुळे आमदार शशिकांत शिंदे गटाला मानहानीकारक पराभवाला सामारे जावे लागले आहे.