भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील आठ देवस्थानाच्या जमिनीचा समावेश आहे.

आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ, मनोज रत्नपारखे आणि अस्लम पठाण यांच्यासह अनेक लोक यामध्ये सहभागी आहेत. दरम्यान मंगळवारी सुरेश धस यांच्यासह संबधितांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे 13 (1) (अ) (ब), 13 (2) ipc 465,468,471,120 ब, 109 नुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणातील तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरावे, असे सांगितले होते.

त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र, जे औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले होते, तेच आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. त्यानंतर बीडच्या लाचलुचपत पथकाने मंगळवारी रात्री उशीरा आमदार सुरेश धस यांच्यासह संबधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाने धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्यानंतर हिंदू देवस्थानच्या जमिनीची बेकायदेशीर हस्तांतरणाची 8 प्रकरणे समोर आली होती. याचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता. मात्र, एसआयटीने अहवाल दिल्यावरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची दखल घेत आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात आधी फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश दिले होते. अखेर कोर्टाच्या आदेशानंतर सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.