राज्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण बदल घडून येणार आहे. त्याबाबतची बातमी आता समोर आली आहे. मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी पुढील शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा आढावा घेतला जात असून आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये शिक्षण विभागासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्न चा अंगीकार करून त्यात राज्य प्रमाणेच आवश्यक बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. या संदर्भातली माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका मराठी माध्यमाशी बोलताना दिली आहे.
शिक्षण क्षेत्रात महत्वाचे बदल
नव्या शिक्षण पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचं भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच केंद्रीय शिक्षण पद्धतीचा गरजेनुसार अवलंबही केला जाईल. चालू वर्षात पहिलीच्या वर्गात सीबीएससी पॅटर्नचा विचार आपण करत आहोत पुढच्या टप्प्यात सीबीएसई पॅटर्नच्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्या आपण शाळेमध्ये घेऊ असं दादा भुसे यांनी सांगितलं. 2026 27 मध्ये सीबीएससी पॅटर्न चा वापर होईल असंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितला आहे त्यामुळे या वर्षापासून नाही तर पुढच्या वर्षापासून राज्यातही सीबीएससी पॅटर्न प्रमाणे शिक्षण पद्धती अवलंबली जाईल.
शाळांमध्ये राज्यगीत अनिवार्य
पुढे बोलताना मंत्री भुसे यांनी राष्ट्रगीता बरोबरच शाळांमध्ये इथून पुढे राज्यगीत होणे अनिवार्य असल्याचे मत व्यक्त केलं. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की राज्यातील अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यापुढे राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत लावणं सक्तीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठी भाषा प्रत्यक्षात शिकवण सक्तीचं असल्याचंही पुढे भुसे यांनी सांगितलं.
शिक्षण विभागासाठीच्या महत्वपूर्ण सूचना
शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा.
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा.
समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे. तथापि, कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या, पालकांचा विश्वास रहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी.