औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोना महामारीला हरवण्यासाठी शहरात निर्बंध लावण्यात आले आहे. बुधवारी मुस्लिम समाजाची बकरी ईद साजरी केली जाणार आहे. बकरी ईदची नमाज अदा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, मज्जीद किंवा इदगाहमध्ये गर्दी न करता घरीच पवित्र नमाज अदा करा आणि कोरोनाचे नियम पाळा असे आवाहन पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.
सर्वधर्मीयांच्या शांतता समितीच्या झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन दिले आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी पोलिसांनी पथक निर्माण करून शांततेचे आवाहन केले आहे. मुस्लिम समाजाची बकरी ईद बुधवारी साजरी होणार आहे. त्यानिमित्त जनावरांचा बाजार भरण्यावर बंदी असल्यामुळे नागरिकांनी जनावरे खरेदी करताना ऑनलाईन किंवा फोनचा वापर करावा. ग्रामीण भागात 29 जुलै पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहे.
सिल्लोड, बोरगाव बाजार,घटनांद्रा, अंधारी, अजिंठा, शिवणा, पैठण, चितेगांव, कन्नड, पिंपळवाडी, खुलताबाद, पिशोर, वैजापूर, खंडाळा, म्हस्की, लाडगाव, शिऊर, लोणी, गंगापूर, लासूर स्टेशन, देवगाव रंगारी, औराळा, बिडकीन, पाचोड, आडुळ, वरुडकाजी, देवळाई, करमाड, पिंपरीराजा, फुलंब्री, आळंद, वडोदबाजार, फर्दापूर, सोयगाव या ठिकाणी अठराशे पोलिसांचे बंदोबस्त केले आहे. त्याचबरोबर 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, 17 पोलीस निरीक्षक, 33 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 72 पोलीस उपनिरीक्षक, 1243 पोलीस अंमलदार, 420 होमगार्ड यांच्या सोबतच एसआरपीएफ, दंगा काबू पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे.