चंद्रकांत खैरेंची खरंच राजकीय निवृत्ती की इमोशनल ब्लॅकमेलिंग??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी फक्त ही पाच वर्षे लढणार आहे. मी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत उभा राहणार नाही. 2029 ला अंबादास दानवे किंवा पक्ष देईल तो उमेदवार असेल, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं हे जाहीर स्टेटमेंट. छत्रपती संभाजी नगरमधील शिवसेनेचा वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं. सलग चार टर्म खासदार राहिलेल्या खैरेंना 2024 उजाडताना आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करावी लागली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचा पराभव करत जायंट किलर ठरलेले खैरे शिंदेंच्या बंडात मातोश्रीशी एकनिष्ठ राहिले. शिंदेंना आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोरांना सर्वात जास्त कुणी शिंगावर घेतलं असेल तर ते चंद्रकांत खैरे यांनीच… हे सारं एकदा फ्लॅशबॅक करून पाहिलं तर खैरे यांच्या राजकारणातून संन्यास घेण्याच्या निर्णयावर डाऊट यायला लागतो…अंबादास दानवे म्हणतील तो यापुढचा शिवसेनेचा उमेदवार असेल, हा मुद्दा हायलाईट केला तर यातून खैरे इमोशनल ब्लॅकमेल करतायत का, असाही एक निसटता धागा सापडतो. छत्रपती संभाजीनगर मधील हिंदुत्वाचा मोठा चेहरा म्हणून ज्या चंद्रकांत खैरे यांना ओळखलं जातं 2019 चा अपवाद वगळता त्यांनी प्रत्येक निवडणुकीत भलं मोठं लीड घेत विरोधकाला पाणी पाजलं. याच आक्रमक स्वभावाच्या खैरेंना मात्र यंदा निवडणुकीच्या तोंडावर इमोशनल अपील का करावं लागतंय?

चंद्रकांत खैरेंनी 2029 ला निवडणूक न लढवण्याच्या घेतलेल्या निर्णयाकडे राजकीय निवृत्ती आणि इमोशनल ब्लॅकमेलिंग अशा दोन चष्म्यांतून आम्ही पाहतोय. याला पहिलं कारण आहे ते म्हणजे खैरे यांना वाढलेला पक्षांतर्गत विरोध… मुंबई, ठाण्याबाहेरचा शिवसेनेचा पहिला बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगर. इथंच उपनगरप्रमुख, नगरसेवक आणि दोन टर्म आमदार असा राजकीय प्रवास करत चंद्रकांत खैरे यांच्या रूपाने शिवसेनेला एक मोठं नेतृत्व मिळालं. 1999 ला ए. आर. अंतुले यांचा पराभव करत खासदार झालेल्या खैरेंनी दिल्लीतल्या राजकारणाला हात घातला तो थेट 2019 पर्यंत. सलग चार टर्म खासदार राहिलेल्या या शिवसेनेच्या वाघाला एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी वंचितच्या मदतीनं पाणी पाजलं. मात्र पाच वर्ष सत्तेतून बाहेर असलेल्या चंद्रकांत खैरे यांना पक्षांतर्गतच विरोधाला सामोरं जावं लागलं. शिवसेनेच्या फुटीनंतर ज्या अंबादास दानवे यांच्या नावाची पक्षात हाईप झाली. तेच दानवे छत्रपती संभाजी नगरच्या उमेदवारीसाठी अडून बसले. 2009 पासून इथून निवडून जाण्याचं आपण कायम स्वप्न पाहिलं, असं म्हणून दानवेंनी खैरेंच्या अडचणी वाढवल्या. खैरेंनीही 2019 ला आपला जो काही पराभव झाला त्याचं काही प्रमाणात खापर हे अंबादास दानवेंवरही फोडलं.

Chandrakant Khaire शिंदे गट आणि भाजपला घाबरले आहेत | Chatrpati Sambhaji Nagar

शाब्दिक चकमकी झाल्या, दानवेंना शिंदे गटाकडून उमेदवारीची ऑफरही आली मात्र खैरे यांनाच सलग सहाव्यांदा छत्रपती संभाजी नगरच तिकीट रिपीट करण्यात आलं. दानवे नाराज होतील, बंड करतील अशा अनेक चर्चांना तोंडं फुटली. पण आपण मराठवाड्यात मशालच तेवत ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ‘तुम्ही आता खैरे यांचं काम करणार का?’ असा जेव्हा दानवेंना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, खैरेंचं नाही शिवसेनेचं… उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं…मी कोणत्याही व्यक्तीचं काम करत नाही, मला फक्त शिवसेनेचा विचार आणि उद्धव साहेबांचं नेतृत्व एवढेच प्रिय आहे…

दानवेंनी दिलेल्या या उत्तरातून खैरे विरुद्ध दानवे हा संघर्ष कोणत्या टोकाला जाऊन पोहोचलाय, याचा अंदाज येतो. त्यामुळ लोकसभेचं मैदान मारायचं असेल तर वितृष्ट बाजूला ठेवून काम करावे लागेल, याची जाणीव खैरेंना झाली. अंबादास दानवेंसोबत कसं जुळवून घेता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले. छत्रपती संभाजीनगर मधल्या ज्या गंगापूर विधानसभा मतदारसंघावर दानवेंची पकड आहे तिथलं लीड हे प्रत्येक वेळेस सरप्लस मार्जिन मिळवून देतं. गेल्या वर्षी खैरेंना फटका बसला होता, तो इथूनच…दुसरं म्हणजे या पट्ट्यात दानवेंना मानणारा एक मोठा शिवसैनिकांचा वर्ग आहे. त्यासोबतच कार्यकर्त्यांची फळी देखील दानवेंचा शब्दच अंतिम मानणारी आहे. या सगळ्याचा सारासार विचार करून जेव्हा दानवे आणि खैरे झाला गेला भूतकाळ विसरून एकत्र प्रचाराच्या कामाला लागलेत, तेव्हा दानवेंची नाराजी दूर करण्यासाठीच खैरेंनी टाकलेला हा इमोशनल बाउन्सर आहे. दानवेंनी दिल्लीचे होप्स कायम ठेवावेत, यासाठीच खैरेंनी ही खेळलेली खेळी असू शकते.

इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याची वेळ खैरेंवर आली असं आम्ही म्हणतोय त्याला दुसरं कारण म्हणजे जलील यांच्याकडून झालेला पराभव

सलग चार टर्म निवडून जाणाऱ्या खैरेंना 2019 मध्ये मात्र एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीत जिंकणं – हरणं होतच राहतं, इतक्या ढोबळमानाने या निकालाकडे बघून चालत नाही. छत्रपती संभाजीनगर हा तसा रीजनल बेसिसवर आधारित असणारा मतदारसंघ. हिंदूंसोबतच मुस्लिमांचीही संख्या जेमतेम सारखीच. मात्र शिवसेनेच्या हिंदुत्वापुढे एमआयएमचं राजकारण इथं कधीच शिजलं नाही. चंद्रकांत खैरे यांच्या रूपाने संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भगवाच फडकत राहिला. मात्र नरेंद्र मोदींची हवा असताना, भाजपची ताकद सोबत असताना चंद्रकांत खैरे याच रिजनल जागेवरून पडले, हा मेसेज लोकांमध्ये चुकीच्या अर्थाने जातो. शिवसेनेचं छत्रपती संभाजीनगर मधील वर्चस्व कमी झालंय की काय, अशाही शंका मतदार घेऊ लागलेत.

त्यात यंदाची निवडणूक तिरंगी होणार हे कन्फर्म आहे. ‘बान हवा की खान’ असं वातावरण तापवून निवडणूक आपल्या बाजूने खेचून आणण्यात शिवसेनेला यंदा मात्र अडचणी आहेत. कारण राम मंदिर, औरंगाबादचं नामांतरण या मुद्द्यांचा प्रभावी वापर करून भाजपला धार्मिक ध्रुवीकरणाची मोठी संधी आहे. त्यात आधीच हिंदू नेता अशी इमेज बिल्डर झाल्यामुळे मुस्लिम समाजाच्या मतांचं सोशल इंजिनिअरिंग करणं एमआयएममुळे जरा जास्तच अवघड आहे. त्यामुळेच चंद्रकांत खैरे यांनी इमोशनल कार्ड खेळायला सुरुवात केली असावी…

आता येतो सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे मतदारसंघाची बदललेली समीकरणे……..

पाहायला गेलं तर मतदारसंघात सहा पैकी चार आमदार हे शिवसेनेचे होते. त्यामुळे वंचित – एमआयएमची ताकद आणि हर्षवर्धन जाधवांमुळे मराठा ओबीसी समाजाच्या मत विभाजनाचा फटका हा खैरेंना बसला होता. मात्र 2024 मध्ये नीट तालीम केली असती तर हा गड शिवसेनेला आरामात आणता आला असता. पण यात मिठाचा खडा पडला तो शिंदेंच्या बंडामुळे. मतदारसंघातील प्रदीप जैस्वाल, संदीप शिरसाट आणि रमेश बोरणारे या तीन आमदारांनी शिंदेंना बळ दिल्यामुळे ठाकरेंची ताकद काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. त्यात महायुती एकदिलाने लढली तर खैरेंसाठी घोडे मैदान लांब दिसतंय. इतकच नाही तर राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना या जास्तच धारदार झालेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे शिवसेनेत उद्धव ठाकरेंवर झालेल्या अन्यायाचं इमोशनल भांडवल करत खैरेंना कितपत मत फिरवता येतात, हे देखील पहावं लागेल…

या सगळ्या निगेटिव्ह बाजू असल्या तरी शिवसेनेचं छत्रपती संभाजी नगर मधील मजबूत केडर, शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग, महाविकास आघाडीची ताकद आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचं होऊ शकणार सोशल इंजीनियरिंग हे सगळे फॅक्टर आजही चंद्रकांत खैरे यांची ताकद बनून आहेत. एकूणच काय तर पक्षांतर्गत दानवेंना शांत करण्यासाठी तर काही प्रमाणात मीडियाच्या फोकसमध्ये येण्यासाठी खैरेंनी ही राजकीय निवृत्ती कम इमोशनल ब्लॅकमेलिंग? केली असं म्हणता येऊ शकतं… जाता जाता चंद्रकांत खैरे यांनी 2019 च्या निवडणुकीतही ही आपली शेवटची निवडणूक असल्याचा शब्द दिला होता असो…