फुले-आंबेडकरांनी शाळा उभारण्यासाठी भीक मागितली; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांकडून महापुरुषांच्या बाबतीत अपमानकारक वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. “पूर्वीच्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरी सुद्धा महापुरुषांनी तेव्हा शाळा उभ्या केल्या. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे पाटील यांनी म्हंटले.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आज पैठणमधील एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली. त्याकाळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरी सुद्धा महापुरुषांनी तेव्हा शाळा उभ्या केल्या. मात्र, लोक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर विसंबून राहतात. त्याकाळात लोक दहा रुपये देणारे होते. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

अगोदरच राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादामुळे अडचणीत आले आहेत. आता त्यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल एक वक्तव्य केले असल्यामुळे यावरून विरोधकांकडून निशाणा साधला जाणार हे नक्की.