Wednesday, June 7, 2023

शेतकऱ्याने शासनाला परत केला नुकसान भरपाईचा धनादेश

चंद्रपूर प्रतिनिधी । मूल तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी झाल्यामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. जमिनीचीही खरड झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यातच शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन मदत दिली. मात्र ही मदत अत्यंत अल्प असल्यामुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याने शासनाने दिलेला धनादेश शासनालाच परत पाठवून आपला निषेध व्यक्त केला आहे. तसं निवेदनही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना उपविभागिय अधिकारी यांच्यामार्फत पाठविल आहे.

मूल तालुक्यातील येरगांवचे शेतकरी रूमदेव मारोती गोहणे यांची मौजा खंडाळा तलाठी साजा पिपरी दिक्षीत गट क्रमांक १७ मध्ये २.८९ हेक्टर शेती आहे. सदर शेतीमध्ये यावर्षी कापासाचा पेरा केलेला होता. त्यासोबतच ६ एकरात धानाचे पिक घेतले होते. त्यासाठी १ लाख २५ हजार रूपये खर्च आला. परंतु अतिवृष्ठी व परतीच्या पावसाने धानावर बुरशीजन्य व मानमोडी रोग आल्यामुळे ६ एकरात केवळ ४२ पोते धान झाले. या धानाची विक्री केल्यावर शेतक—याच्या हातात फक्त ७२ हजार रूपये मिळाले. पिक घेण्यासाठी लावलेले पावने २ लाखाचे मातीकाम सुद्धा वाहुन गेले.

तलाठ्याने कामाचा सर्वे करून १०० टक्के नुकसान झाल्याचे दाखविले. त्यानंतर शासनाने नुकसान भरपाई म्हणुन तहसिल कार्यालयामार्फत फक्त १२८० रूपये शेतकरी रूमदेव गोहणे यांच्या खात्यात जमा केले. ही रक्कम अतिशय अल्प असल्याने ही शेतकऱ्यांची थट्टा केलेली असुन आता शेतकरी शासनाचा निषेध करीत आहे. तालुक्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांनी अल्प नुकसान भरपाईची रक्कम शेतशेतकऱ्यांनी शासनाला परत करावी असे आवाहनही शेतकरी रूमदेव गोहणे यांनी केलेले आहे.