Wednesday, March 29, 2023

दारु तस्करांचे वाहन पलटी, १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

- Advertisement -

चंद्रपूर प्रतिनिधी। आरवट मार्गे पठानपुरा गेटमधून शहरात दारू तस्करी करीत असताना एका मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन उलटल्याने तस्करांचा दारू तस्करीचा ऐन वेळी डाव फसला. वाहन पलटी झाल्याने पकडले जाण्याच्या भीतीने वाहनचालक व अन्य आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आरवट मार्गे क्रमांक एमएच ३१/२२०३ या क्वालिस वाहनाने १० पेट्या विदेशी आणि ७० पेट्या देशी दारूचा साठा चंद्रपुरात आणला जात होता. दरम्यान पठाणपुरा गेटच्या बाहेर आरवट मार्गावर इरई नदी पुलापासून काही अंतरावर भरधाव वेगाने येत असलेल्या वाहन चालकाने सायकलस्वार मुलीला धडक दिली. चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन बाजूच्या शेतात जाऊन उलटले. यानंतर वाहनचालकाने व त्याच्या सोबत असलेल्या अन्य एका आरोपीने पळ काढला. या घटनेत सहारा पार्क येथील स्नेहा नामक एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान वाहनाच्या अपघाताची माहिती शहर पोलिसांना मिळताच ठाणेदार बहादुरे यांनी पीएसआय चालुरकर यांच्या नेतृत्वात एक पथक घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी पंचनामा करून वाहनाची झडती घेतली असता ८० पेट्या दारूसाठा आढळून आल्या. पोलिसांनी साडे पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. हे वाहन कोठून येत होते आणि कोणाकडे दारू उतरविली जात होती याचा शोध घेण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे.