Chandrapur Lok Sabha 2024 : चंद्रपुरातील काँग्रेसच्या एकमेव मतदारसंघाला भाजपचा घेराव; वंचित रंगत आणणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या मोदी लाटेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुऱ्या महाराष्ट्रातून सुपडा साफ झाला. फक्त एकाच जागेवर या भल्या मोठ्या पक्षाला नाममात्र विजय मिळाला. काँग्रेसमधला हा कुणी मातब्बर खासदार नव्हता. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांनी पहिल्यांदाच खासदारकी मिळवत हा पराक्रम केला होता. सलग तीन टर्म निवडून येणाऱ्या आणि तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री पदावर असणाऱ्या हंसराज अहिर या मातब्बर भाजप नेत्याला त्यांनी आसमान दाखवलं होतं. मात्र धानोरकरांचं अकाली निधन झालं आणि मतदारसंघातील काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली. लोकसभेला एक वर्ष बाकी असतानाही चंद्रपूरची पोटनिवडणूक काही झाली नाही.

आता महाविकास आघाडीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच सून बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांना (Pratibha Dhanorkar) तिकीट देण्यात आले आहे. तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपुरात मोठी काटे कि टक्कर पाहायला मिळेल. भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवत हंसराज अहिर यांच्या ऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट दिल्याने अहिर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची शक्यता आहे. त्याचा फायदा प्रतिभा धानोरकर याना होतो का ते पाहावं लागेल. प्रतिभा धानोरकर यांनी आधीच ‘लेक वणीची, सून चंद्रपूरची’ असा प्रचार सुरू केला. प्रतिभा धानोरकर या धनुजे कुणबी आहेत. शिवाय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येणारे वरोरा, आर्णी आणि वणी हे तीन विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे कुणबी बहुल आहेत. त्यामुळे इथला मतदारवर्ग 2019 ला बाळू धानोरकरांच्या पाठिशी उभा होता.आताही हा मतदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठीमागे उभा राहू शकतो.

मात्र वंचित बहुजन आघाडी याठिकाणी प्रतिभा धानोरकर यांची अडचण निर्माण करू शकते. महाविकास आघाडीसोबत चर्चा फिस्कटल्यानंतर आंबेडकर यांनी वंचित कडून राजेश बेले याना चंद्रपूर मधून तिकीट दिले आहे, त्याचा फटका . प्रतिभा धानोरकर याना बसू शकतो असं बोललं जात आहे. त्यातच काँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणेच अधिक आहेत. वडेट्टीवार, धोटे व धानोरकर अशा गटातटात हा पक्ष विखुरलेला आहे. याचा मेजर फटका काँग्रेसला येत्या निवडणुकीत बसू शकतो.

दुसरीकडे सुनील मुनगंटीवारांनीही या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपच्या ‘घर चलो अभियाना’ची सुरुवात सुद्धा चंद्रपूरमधूनच करण्यात आली. लोकसभा मतदार संघात भाजपने 2 हजार 185 बुथची रचना केली आहे. या बुथवरील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा 24 कलमी कार्यक्रमही तयार करण्यात आलाय. अनेक कॅबिनेट मंत्री आणि भाजपच्या नेत्यांचा या मतदारसंघात राबता वाढलाय. त्यातच सुनील मुनगंटीवार यांच्यासारखा अभ्यासू उमेदवार दिल्याने भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुनगंटीवारांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे सहावेळा प्रतिनिधित्व केलं आहे.तसेच त्यांची मतदारसंघातील पक्षसंघटनेवरही पकड आहे. त्यामुळे चंद्रपुरात काटे कि टक्कर पाहायला मिळणार हे नक्की..