Saturday, March 25, 2023

शरद पवारांना भाजपसोबत युती करायची होती पण फडणवीस मुख्यमंत्री नको होते

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील पहाटेच्या शपथविधीवरून गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा चर्चा सुरु आहेत. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांना 2019  मध्ये भाजप सोबत युती करायची होती. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते असा खळबळजनक खुलासा बावनकुळे यांनी केला आहे. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात आले असताना त्यांनी हा दावा केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शरद पवार भाजपसोबत युती करणार होते मात्र त्यांना फडणवीस नको होते. शरद पवारांना भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास काही हरकत नव्हती. त्यांना फडणवीस सोडून कुणीही मुख्यमंत्री आणि कुठलाही पक्ष चालला असता. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी शरद पवार कोणत्याही स्तराला जाऊ शकतात असा आरोप बावनकुळे यांनी केला.

- Advertisement -

बावनकुळे पुढे म्हणाले, शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटत होती. फडणवीसांनी 2014-19 या काळात ज्यापद्धतीने काम केलं आहे, ते पाहता जर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर महाराष्ट्रात पुढील 15 वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येता येणार नाही, अशी भीती शरद पवारांना वाटत होती. दरम्यान, बावनकुळेंच्या या विधानानंतर राष्टवादी काँग्रेस कडून काय प्रत्युत्तर येते हे आता पाहावं लागेल.