भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) चंद्रयान-3 मोहिमेने मोठा वैज्ञानिक शोध लावला आहे. या मोहिमेतील विक्रम लँडरवर बसवलेल्या ChaSTE डिव्हाइसने (Chandra’s Surface Thermophysical Experiment) चंद्राच्या बाह्य भागातही पाण्याच्या बर्फाचे संभाव्य संकेत मिळाले आहेत. हा शोध भविष्यात चंद्रावर मानवसाठी तापमान नियंत्रित निवासस्थाने निर्माण करण्यास मदत करू शकतो.
पृथ्वीवरील वैज्ञानिकांचा मोठा शोध
हा संशोधन अभ्यास प्रसिद्ध ‘कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायरमेंट’ या विज्ञान पत्रिकेत प्रकाशित झाला आहे. अहमदाबादच्या PRL (Physical Research Laboratory) संस्थेच्या वैज्ञानिकांनी चंद्राच्या उच्च अक्षांशावरील तापमानातील बदलांचा अभ्यास केला. यात असे आढळले की, ज्या भागांवर थेट सूर्यप्रकाश पडत नाही, तिथे तापमानात मोठे चढ-उतार होतात आणि या भागांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता अधिक असते.
ChaSTE डिव्हाइस म्हणजे काय?
ChaSTE डिव्हाइस हे चंद्राच्या पृष्ठभागाचा तापमान मोजण्यासाठी बसवलेले एक विशेष थर्मामीटर आहे. यापूर्वी संपूर्ण चंद्राच्या तापमानाचा अंदाज फक्त उपग्रहांद्वारे घेतला जात होता, मात्र ChaSTE च्या मदतीने प्रत्यक्ष चंद्राच्या मातीखालील तापमान नोंदवता येत आहे.ChaSTE डिव्हाइसने केलेल्या महत्त्वपूर्ण निरीक्षणांपैकी एक म्हणजे, चंद्राच्या पृष्ठभागावर आणि त्याच्या 10 सेमी खालील थरांमध्ये सुमारे 60 डिग्री सेल्सियसचा फरक आहे.
जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, तिथे पाण्याच्या बर्फाची शक्यता जास्त
PRL च्या वैज्ञानिकांनी ChaSTE च्या मदतीने मिळालेल्या तापमान माहितीचा उपयोग करून शिवशक्ती पॉइंटसारख्या भागांमध्ये पाण्याच्या बर्फाच्या शक्यतेचा अभ्यास केला. यापूर्वी चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांमध्येच पाण्याची बर्फाची शक्यता असल्याचे मानले जात होते, कारण तेथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही.
चंद्रयान-3 दक्षिण ध्रुवाच्या 70° अक्षांशावर उतरले होते, जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील सर्वात जवळचे स्थान आहे. वैज्ञानिकांच्या निरीक्षणानुसार, चंद्राच्या भूप्रदेशानुसार तापमान मोठ्या प्रमाणात बदलते.
सूर्याच्या दिशेने झुकलेल्या भागात तापमान: 355 केल्विन (82°C)
समतल भागात तापमान: 332 केल्विन (59°C)
या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, चंद्राच्या बाह्य भागातही विशिष्ट ठिकाणी पाण्याच्या बर्फाचे अस्तित्व असू शकते. हा शोध भविष्यात चंद्रावर मानवी वसाहती उभारण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. चंद्रयान-3 च्या या ऐतिहासिक शोधामुळे भारताची अंतराळ संशोधन क्षेत्रातील कामगिरी अधिक भक्कम झाली असून, भविष्यात चंद्रावर मानवासाठी नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.