भारतरत्न मिळालेले चौधरी चरणसिंग, नरसिंह राव आणि डॉ. स्वामीनाथन यांचे देशासाठीचे योगदान जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणाऱ्या माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामीनाथन आणि माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव याना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. यानिमित्ताने आज आपण या तिन्ही दिग्गजांचे देशाप्रती असलेले योगदान जाणून घेणार आहोत.

पीव्ही नरसिंह राव –

पीव्ही नरसिंह राव यांचा जन्म करीमनगर (आता तेलंगणा, भारतात) जवळील एका लहानशा गावात झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज, त्यानंतर मुंबई आणि नागपूर विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले. नरसिंह राव यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात म्हणजे 1957 ते 1977 या काळात त्यांनी आंध्र प्रदेश राज्य विधानसभेत काम केले, इंदिरा गांधी जेव्हा 1969 मध्ये काँग्रेस पक्ष संघटनेतून वेगळ्या झाल्या तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारमध्ये मंत्री, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री,देशाचे परराष्ट्र मंत्री आणि त्यानंतर थेट देशाचे पंतप्रधान पदापर्यंत त्यांनी मजल मारली. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाच्या समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. 1991 साली भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना, देशावर आर्थिक संकट आलं असताना त्यांनी नव्या आर्थिक सुधारणा हाती घेतल्या. त्यावेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांच्या साथीने त्यांनी 1991 साली भारतीय अर्थव्यवस्था खुली केली आणि जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण राबवले. पीव्ही नरसिंह राव यांच्या कार्यकाळात देशातील आर्थिक विकासाचे नवीन पर्व सुरू झाले. भारताच्या परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाव्यतिरिक्त, त्यांना एक नेता म्हणून त्यांना ओळखले जायचे.

श्री. चरण सिंह –

श्री. चरण सिंह यांचा जन्म 1902 मध्ये उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्हयातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असताना चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. देशाचे अर्थमंत्री असताना त्यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना केली. त्यानंतर 28 जुलै 1979 रोजी ते भारताचे पंतप्रधान झाले. ग्रामीण कर्जदारांना दिलासादायक ठरलेले विभागीय कर्जमुक्ती विधेयक, १९३९ तयार करण्यात आणि अंतिम प्रारूप देण्यामध्ये श्री. चरण सिंह यांची महत्वपूर्ण भूमिका होती. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उत्तरप्रदेशातील मंत्र्यांचे वेतन व त्यांना मिळणाऱ्या अन्य लाभांचे प्रमाण बरेच कमी करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून जमीन धारणा कायदा, १९६० बनविण्यामध्येही महत्वपूर्ण भूमिका होती. चरणसिंग यांनी भारतातील गरीबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांसाठी जमीन, प्रिवेन्शन ऑफ डिविजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम, को-ऑपरेटीव फार्मिंग एक्स-रेड या पुस्तकांचे लिखाण केलं.

डॉ. स्वामीनाथन-

भारतीय हरित क्रांतीचे जनक मानले जाणारे एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूतील तंजावूर येथे झाला होता. त्यांनी झुलॉजी, एग्रीकल्चर दोन्ही विषयात विज्ञानात पदवी संपादन केली होती. शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांनी जगभरात सन्मान मिळाला होता. भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांना जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला आहे. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात डॉ. स्वामीनाथन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली. डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली 18 नोव्हेंबर 2004 साली स्वामीनाथन आयोगाची स्थापना करण्यात आली. या अहवालात आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचविले होते. यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची तरतूद असावी, तसेच किमान आधारभूत किंमत (हमीभाव) अंमलबजावणीत सुधारणा करावी. या त्यांच्या तरतुदी आजही समाजमनात सतत चर्चेत असतात. आज देशातील मोदी सरकारने या सर्व दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा योग्य सन्मान केला आहे.