लोकसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ मैदानात उतरणार? राजकिय वर्तुळात चर्चांना जोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) राज्यातील विविध पक्ष आपले उमेदवार जाहीर करू लागले आहेत. अशातच राजकीय वर्तुळातील समीकरण पलटवणारी एक बातमी समोर आली आहे. आता लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मैदानात उतरणार आहेत. उद्या 1 वाजता पुण्यात अजित पवार गटाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात येईल. त्यावेळी नाशिक मतदारसंघातून भुजबळ कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

उद्या म्हणजेच बुधवारी पुण्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक उद्या एक वाजता घेण्यात येईल. या बैठकीसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नाशिक मतदारसंघातील पदाधिकारी ही उपस्थित राहतील. त्यामुळे यावेळी नाशिक मतदारसंघात भुजबळ कुटुंबातील सदस्य उमेदवार म्हणून उभा करण्यासाठी निर्णय घेण्यात येऊ शकतो. कारण, महायुतीत राष्ट्रवादीने साताऱ्यातील जागेवरचा दावा सोडल्यामुळे राष्ट्रवादीला नाशिकची जागा मिळण्याबाबत दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास नाशिक मतदारसंघातून लोकसभेसाठी भुजबळ मैदानात उतरतील.

सध्या सोशल मीडियावर देखील छगन भुजबळांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातच अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि समीर भुजबळांच्या नावाची चाचणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच नाशिक मतदारसंघातून भुजबळ कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याच्या चर्चांचा आणखीन जोर वाढला आहे. दरम्यान या सर्व चर्चांबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, “माझं नाव तुम्हीच चर्चेत आणले. पण याबाबत तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील. भुजबळ कुटूंबाला उमेदवारी पाहीजे अशी माझी मागणी नाही. यात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही”