छत्रपती उदयनराजेंचा ‘संकल्पनामा’ जाहीर; मतदारांना केलं थेट आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. उदयनराजे भोसले यांचा २०१९ च्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या समोर शरद पवार गटाचे आव्हान आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा थेट सामना होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा निवडणूक जिंकायचीच असा चंग राजेंनी बांधला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज उदयनराजेंनी आपला संकल्पनामा जाहीर केला आहे. सातारचा जवान आमची शान…तुमचं शौर्य आमचा अभिमान ! या टॅगलाईनने उदयनराजेंचा निवडणूक संकल्पनामा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी उदयनराजेंनी जवानांना साद घातली आहे.

उदयनराजेंचा ‘संकल्पनामा जसाच्या तसा –

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला दोन सरसेनापती देणाऱ्या आपल्या जिल्ह्याची लढाऊ परंपरा तुम्ही जोपासत आहात. देशाच्या सीमांचं प्राणपणानं रक्षण करणारे तुम्ही भारतमातेचे खरे सुपुत्र आहात. तुमचे परिश्रम आणि पराक्रम यांची जाणीव असलेलं कणखर सरकार केंद्रात गेली दहा वर्षे सत्तेत आहे आणि देशाच्या छुप्या शत्रूंच्या कारवाया मोडून काढण्याच्या धोरणामुळं दहशतवाद कमी झाला आहे, हे तुम्ही जाणताच. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह यांच्या भक्कम नेतृत्वामुळं आपल्या देशाचा जगात दबदबा निर्माण झाला असून, भारताची भूमिका जगाकडून आज गांभीर्यानं घेतली जाते.शिवछत्रपतींच्या घराण्याचा वारसदार म्हणून अशा शक्तिशाली सरकारसोबत काम करणं आम्हाला अभिमानास्पद वाटतं आणि कोणत्याही लढाईचा प्रारंभ लढवय्यांच्या साथीनं करण्याचा शिरस्ता कायम ठेवून आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत.

दहशतवाद्यांशी तुम्ही सातत्यानं दोन हात करीत आलात आणि या संघर्षाला पूरक कायदे करून मोदी सरकारनं तुमचं सामर्थ्य वाढवलं. काश्मीरला विशेषाधिकार देणारं घटनेचं ३७० वं कलम रद्द करण्याबरोबरच या सरकारने घुसखोरी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जवानांच्या शौर्याबद्दल, त्यागाबद्दल कृतज्ञता आहेच; पण ती कृतिशील असावी, या भावनेतून भावी लढवय्ये तयार करणाऱ्या साताऱ्याच्या सैनिक स्कूलच्या अद्ययावतीकरणासाठी भरघोस निधी आणण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला. ‘वन रँक वन पेन्शन’ सारख्या जवानांच्या जिव्हाळ्याचा विषय आम्ही लावून धरला, हेही तुम्ही जाणता. स्थानिक स्तरावर सैनिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्याधुनिक ईसीएचएस पॉलिक्लिनिक उभारणीस आमचा हातभार लागला. सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातून माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यासाठी अर्थसंकल्पातच तरतूद करणारी सातारा ही पहिली नगरपरिषद ठरली. सैनिकांना घरपट्टीत सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णयही सातारा नगरपरिषदेनेच सर्वप्रथम घेतला.

कर्नल संतोष महाडिक स्मारकाचं काम पूर्ण झालंय. ईसीएचएस पॉलिक्लिनिकला ए क्लास दर्जा मिळावा, सशस्त्र सैन्यदलांसाठी वेगळा वेतन आयोग असावा, आजी-माजी सैनिकांसाठी गृहनिर्माण योजना असावी, यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत आणि यापुढेही राहतील. देशाला सुरक्षित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांचे ऋण कधीच फेडता येत नाही; परंतु आमच्या हातात जे आहे, ते करण्याचा शब्द आम्ही देतो. शक्य असतील तीच आश्वासने देणं आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी जिवाचं रान करणं, ही आमची कार्यपद्धती आहे आणि यापुढेही राहील.

येत्या सात मे रोजी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचं मतदान होत आहे. नेहमीप्रमाणे याही वेळी जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांचं पाठबळ आम्हाला मिळेल, याची खात्री आहे. तुम्ही कुटुंबीयांसह मतदानात हिरीरीनं सहभागी व्हाल आणि ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून आम्हाला शक्ती द्याल, अशी खात्री बाळगतो. सातारचा जवान देशाची शान… तुमचं शौर्य आमचा अभिमान !