मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीचा अपघात; डोक्याला दुखापत झाल्याची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या गाडीचा आज अपघात (Car Accident) झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. या अपघातात ममता बॅनर्जींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच ममता बॅनर्जींच्या गाडीचे देखील नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज ममता बॅनर्जी यांची या पश्चिम बंगालच्या वर्धमान येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक पार पडली. ही बैठक संपवून हेलिकॉप्टरने त्या कोलकत्ताला परतणार होत्या. मात्र वातावरण खराब असल्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टरने न जाता गाडीनेच जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांचा ताफा देखील होता. हा ताफा कोलकाताच्या दिशेला वेगाने जात होता. याचवेळी गाडीचा ब्रेक न लागल्याने हा अपघात घडला.

या अपघातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यामुळे त्यांना SSKM रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आता ममता बॅनर्जी यांना किरकोळ जखम झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आजच ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच इंडिया आघाडीमध्ये फूट पडली असल्याचे देखील म्हटले जात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच स्थापन झालेल्या इंडिया आघाडीत मोठया घडामोडी घडत आहेत. अशाच आता ममता बॅनर्जींच्या गाडीचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.