चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; केली ‘या’ पदावर निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडण्यात अग्रेसर असलेल्या तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पक्षनेतृत्वाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वाघ यांच्या निवडीची घोषणा करत त्यांना निवडीचे पत्र दिले.

मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी लोकसभा प्रवास योजना बैठक पार पडली. यावेळी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, लोकसभा प्रवास योजना अभियान संयोजक माजी मंत्री बाळा भेगडे, प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व महिला मोर्चा माजी प्रदेशाध्यक्ष आ. उमाताई खापरे यांची उपस्थिती होती. या बैठकीत भाजपकडून चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले.

यापूर्वी उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ या महिलांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडत आहेत. त्यामुळे आता भाजपने वाघ यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे, असे मानले जात आहे.