औरंगाबाद | दोन दुचाकीसह एक रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना मिसरवाडी येथे सिडकोच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी करण्यात आली. प्रदीप लक्ष्मण शेळके (वय 35) रा.भराडी ता. सिल्लोड आणि विनोद नारायण त्रिभुवन (वय 30) रा. गल्ली क्र. 7 मिसरवाडी अशी वाहन चोरांची नावे आहेत.
सिडको विशेष पथक गुन्हेगारांच्या शोधासाठी गस्तीवर असताना दोन दुचाकी चोर मिसरवाडी भागात असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील उपनिरीक्षक कल्याण शेळके, जमादार सुभाष शेवाळे, गणेश नागरे, सुरेश भिसे, विशाल सोनवणे आणि स्वप्निल रत्नपारखी यांनी सापळा रचून दोघांना पकडले.
यावेळी पथकाने त्यांची कसून चौकशी केली असता, सिडको एन-1 भागातून नुकतीच चोरलेली दुचाकी (एमएच 20 बीएफ 3442) आणि चार महिन्यापूर्वी टी पॉईंट जवळील प्यासा वाईन शॉपी समोरून चोरलेली दुचाकी (एमएच 27 बिके 4421) जप्त करण्यात आली. याशिवाय 17 जून रोजी सिडकोतील एन-6 मथुरानगरातील रिबेका शांतवन तोडे (वय 50) रा. सिडको यांच्या मालकीची रिक्षा (एमएच 20 ईके 0938) घरासमोरून लांब गेल्याची कबुली दिली त्यावरून दोघांकडून रिक्षा आणि दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यावरून दोघांकडून रिक्षा आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली.