सातारा पोलिसांकडून “आपले किल्ले आपली जबाबदारी” अंतर्गत भूषणगडावर स्वच्छता मोहीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आज दिनांक 4 जून 2023 रोजी “आपले किल्ले आपली जबाबदारी” अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत किल्ले भूषणगड, ता. खटाव या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये दहिवडी उपविभागातील उपविभागीय कार्यालय तसेच दहिवडी, म्हसवड, औंध, वडूज या पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. तसेच सातारा पोलीस दलातर्फे सदर मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते.

आजच्या या स्वच्छता मोहिमेअंतर्गत भूषणगडच्या पायथ्याशी एकत्रीत येवून चढाई (ट्रेक) करण्यात आली तसेच ग्रुप तयार करुन किल्ल्यावर नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गड पायथा परिसर, तलाव परिसर, महादरवाजा परिसर तसेच हरणाई मंदिर परिसरात स्वच्छता करुन जैविक व अजैविक असा अंदाजे 125 किलो कचरा गोळा करण्यात आला. तसेच त्यानंतर गडावर हरणाई मंदिराच्या सभा मंडपात सर्वांना एकत्रित करुन शिवप्रेमी श्री. मानसिंग कदम, कवठे महाकाळ, सांगली यांनी भूषणगडाबद्दल माहिती दिली.

भूषणगडावरील या स्वच्छता मोहिमेमध्ये श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. कमलेश मिना परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक, श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग कॅम्प वडूज, श्री. अजय कोकाटे, परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक श्री.डी.पी. दराडे, स.पो.नि. आंध पो.ठाणे, श्री. आर. पी. भुजबळ, स. पो. नि. म्हसवड पो. ठाणे, श्री. अक्षय सोनावणे, स.पो.नि. दहिवडी पो.ठाणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. जी. बी. केंद्रे, औंध पोलीस ठाणे असे 15 पोलीस अधिकारी, 40 पोलीस अंमलदार व 150 नागरीक, सामाजिक कार्यकर्ते व विदयार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.

खरं तर 15 जानेवारी 2023 रोजी पासून सातारा पोलीस दलामार्फत आयोजित आपले किल्ले आपली जबाबदारी मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत अजिंक्यतारा, वसंतगड, जरंडेश्वर, वैराटगड , संतोषगड, दातेगड (सुंदरगड) , भूषणगड या ठिकाणी गड मोहिम व स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या असून मोहिमेत आज अखेर 102 पोलीस अधिकारी, 563 पोलीस अंमलदार, 1840 नागरीक व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या काळात एकुण अंदाजे 829 किलो कचरा गोळा करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्हयातील एक किल्ला निवडून सदरची मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहनही सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.