सिक्कीममध्ये ढगफुटी!! नदीच्या महापुरात 23 जवान बेपत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर सिक्कीममधील ल्होनाक सरोवरावर अचानक ढगफुटी झाल्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे, तीस्ता नदीला आलेल्या पुरात 23 जवान बेपत्ता झाले आहेत. तसेच अनेक जवानांच्या गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. या ढगफुटीमुळे तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे आजूबाजूच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. सध्या बेपत्ता झालेल्या या 23 जवानांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली आहे. तसेच, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत यंत्रणा कामाला लागली आहे.

सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगितले जात आहे की, पुरानंतर चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खालच्या भागातील पाण्याची पातळी अचानक 15-20 फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभी असलेली लष्कराची वाहने पाण्यात बुडाली. याशिवाय 23 लष्करी जवानही बेपत्ता झाले. सिक्कीममधील अनेक भागात रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून मदत यंत्रणा राबवण्यात आली आहे.

त्याचबरोबर सिक्कीममधील तीस्ता नदीच्या पाण्याचे पातळी वाढल्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे सिक्कीममधील सिंगथम फूट ब्रिज कोसळला आहे. त्यामुळे जलपाईगुडी प्रशासनाने तीस्ता नदीच्या खालचा भाग रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, बेपत्ता झालेल्या जवानांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र, हे जवान अचानक आलेल्या पुरामध्ये वाहून गेल्याची शंका देखील व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती सदृश्य निर्माण झाले होते. या मुसळधार पावसाने नागपूरमध्ये हा हाहाकार माजवला होता. ज्यामुळे अनेक लोकांचे नुकसान झाले. तर काहींना आपला जीव देखील कमवावा लागला. अचानक मध्यरात्री पासून सुरू झालेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली. प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या बचाव यंत्रणेकडून अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले.