हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली चॅम्पियन लीग T20 स्पर्धा (Champion League T20) पुन्हा एकदा सुरु होण्याची शक्यता आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड क्रिकेट बोर्ड यासाठी एकेमेकांशी चर्चा करत आहे. चॅम्पियन लीग स्पर्धेत या तिन्ही देशातील टॉपचे T20 संघ एकमेकांशी दोन हात करताना दिसतील. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा आयपीएलचा आनंद घेतल्यासारखं वाटेल.
6 वेळा खेळवण्यात आली होती CLT T20
खरं तर चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा २००९ ते २०१४ या दरम्यान सहा वेळा खेळवण्यात आली होती. खास करून दिवाळी सुट्ट्यांच्या काळात म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात चॅम्पियन लीगचे आयोजन झालं होते. त्यावेळी भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजच्या काही सर्वोत्तम संघांमध्ये हि स्पर्धा रंगली होती. आयपीएल मधील चेन्नई सुपरकिंग्स व मुंबई इंडियन्सने प्रत्येकी दोन वेळा चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेचे (CLT T20)विजेतेपद पटकावलं तर ऑस्ट्रेलिया मधील न्यू साऊथ वेल्स ब्लू व सिडनी सिक्सर्स प्रत्येकी एक वेळा ही स्पर्धा जिंकली होती.
सध्या संपूर्ण जगात क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक आहे मात्र तरीही भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट मंडळांकडून चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे अशी माहिती क्रिकेट व्हिक्टोरियाचे विशेष कार्यकारी अधिकारी निक कमिन्स यांनी दिली. ज्यावेळी चॅम्पियन्स लीग टी-२०चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जगात जास्त प्रमाणावर क्रिकेट खेळलं जात नव्हते, पण आता परिस्थिती बदलली आहे, जगातील जवळपास सर्वच क्रिकेट खेळणाऱ्या देशात वेगवेगळ्या टी-२० क्रिकेट स्पर्धाचे आयोजन वाढलं आहे. तरीही आम्ही चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा सुरु करण्याच्या विचारात आहे. कदाचित असेही होऊ शकेल कि पहिली चॅम्पियन्स लीग महिला क्रिकेटमध्ये होईल, ज्यामध्ये WPL, द हंड्रेड आणि महिला बिग बॅश लीगमधील संघ खेळतील.