मध्यंतरी मशिदींच्या भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर राज्यातील मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता कमी करण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल. जर नियमांचा उल्लंघन झालं तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी होते की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर निश्चित केली जाईल. जर पोलीस निरीक्षकानेही याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मशिदींवरील भोंगे आणि त्यातून परिसरातील लोकांना होणारा त्रास यावरून विधानसभेमध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
किती असायला हवा आवाज ?
याबाबत माहिती देताना विधानसभेत फडणवीस म्हणाले की, कुठल्याही प्रार्थनास्थळावर जे भोंगे आहेत त्याची परवानगी घेतली पाहिजे. हे भोंगे रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत बंद असले पाहिजेत. सकाळी सहा ते रात्री दहा या काळात सकाळी 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. त्यापेक्षा जास्त नको असे काही निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्याबाबत कायद्यानुसार जर अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्यावर कारवाईचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रांना दिले आहेत. पोलिसांनी पुढाकार घेऊन एमपीसीबी ला कळवायचं आहे. त्यानंतर त्या बोर्डाने पुढची कार्यवाही जे काही आरोप पत्र कोर्टात खटला भरायचा अशी सध्या कायद्याची परिस्थिती आहे. ज्या प्रकारे या गोष्टींचा अवलंब व्हायला हवा तसा होत नाही. असे देखील त्यांनी आवर्जून सांगितलं.
कोणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी नाहीच
याबरोबरच पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की यापुढे कोणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही.
जी परवानगी मिळेल ती निश्चित कालावधीसाठीच देण्यात येईल.
या कालावधीनंतर पुन्हा भोंगा लावायचा असेल तर त्याची परवानगी पोलिसांकडून घेतली पाहिजे.
ज्या ठिकाणी 55 डेसिबल 45 डेसिबल आवाजाच्या मर्यादा उल्लंघन होईल तिथे परवानगी देण्यात येणार नाही.
जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल याबाबत तंतोतंतपालन होते की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल.
पोलीस निरीक्षकांवर जबाबदारी
प्रत्येक पोलीस निरीक्षकांना त्याच्या विभागातील प्रार्थना स्थळात जाऊन भोंग्यांची परवानगी घेतली आहे की नाही हे तपासलं पाहिजे. आपण सगळ्यांना मीटर दिलं आहे त्यात आवाजाचा डेसिबल मोजता येतं. हे मशीन प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे प्रार्थना स्थळावरील डेसिबल मोजून जर आवाज जास्त असेल तर पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला कळवण त्याच्यामार्फत कारवाई करण आणि दुसरे जे उल्लंघन करतील त्यांना पुन्हा परवानगी नाही. अशी कारवाई केली जाईल. अतिशय कठोरपणे या गोष्टीचा मॉनिटरिंग केलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
याबाबतची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सगळी कारवाई केंद्राने ठरवल्यानुसार एमपीसीबीला करायची आहे. त्यामुळे सध्याचे नियम आहेत त्यात बदल करणे गरजेचे आहे. जर हे नियम बदलले तर अधिक प्रभावीपणे यावर कारवाई करता येईल. यावर केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल. आम्ही जे बदल यात सुचवत आहोत केंद्रांने करून द्यावे जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप भोंग्यांबाबत अत्यंत कडक कारवाई करता येईल. यापुढे भोंग्यांबाबत समस्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल तर त्यांनी काही केले नाही तर कारवाई केली जाईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं