मुंबई-गोवा महामार्गावरील एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई-गोवा महामार्गाबाबत मी स्वत: बैठक घेतली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील एक लेन पूर्ण होईल. तसेच आमचे सरकार काहीही झाले तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आणि राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे महत्वाचे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथे केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथे नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक महत्वाच्या गोष्टीवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, मुंबई – गोवा महामार्गाच्या पुर्णत्वासाठी प्रयत्नशील आहोत. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कामावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एक लेन पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई-सिंधुदूर्ग रस्ता आम्ही ‘ग्रीन फिल्ड’ करतोय. कोकणाच्या विकासासाठी हे महत्वाचे पाऊल तसेच कनेक्टिव्हिटी महत्वाची ठरणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. ते म्हणाले की,सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्यटनास मोठा वाव आहे. त्यामुळे निसर्गाची हानी न करता पर्यटन विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच यापुढे कोणत्याही परिस्थितीत अनाधिकृत बांधकाम होणार नाही, याची दक्षता घेण्याची सक्त सूचना प्रशासनाला केली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांवर कोणत्याही परिस्थितीत हल्ला होता कामा नये. अशा प्रकरणात आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटीसाठी पूल मंजूर केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत मागणीनुसार पाण्याचे टॅंकर दिले जातील. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.