कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जतवर दावा; एकनाथ शिंदे म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य करत कर्नाटकला ठणकावले आहे. एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले, हा ठराव २०१२ चा आहे. तेव्हा त्याठिकाणी पाण्याची टंचाई होती. मात्र त्यांनतर आम्ही तिथे अनेक सुधारणा केल्या आहेत. पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून जलसिंचन, उपसासिंचन अशा अनेक योजना आम्ही मार्गी लावत आहोत. तसंच त्या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या युद्धपातळीवर सोडवल्या जातील. त्यामुळे पाण्यासाठी कोणीही कर्नाटकात जाणार नाही. महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, ही जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयातखटला प्रलंबित आहे. परंतु त्याशिवाय हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याची गरज आहे. केंद्र सरकारही सकारात्मक भूमिका घेईल, दोन्ही राज्याच्या राज्यपालांची सुद्धा बैठक झाली आहे. हा विषय सामोपचाराने सोडवला जाईल अशी आमची भूमिका आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यातील एक गावही कर्नाटकाला जाणार नाही- फडणवीस

दरम्यान, राज्यातील एक गावही कर्नाटकाला जाणार नाही. वेळ आली तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. पण कर्नाटकाला एकही गाव देणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकाला ठणकावलं आहे. या उलट महाराष्ट्रात असणारी बेळगाव, कारवार, निपाणीसह जी गावं आहेत ती आमची आहेत. ती सर्व गावे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत असा इशारा दिला.