मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडच्या सभेत दाखवणार उद्धव ठाकरेंचे ‘ते’ व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिंदे-ठाकरेंमधील सत्तासंघर्षामुळे राज्यातील वातावरण चांगले तापले आहे. दि. 5 मार्च रोजी खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या 40 आमदारांवर सडकून टिका केली होती. त्यांच्या या सभेला उत्तर देण्यासाठी आज एकनाथ शिंदेंची त्याच मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेतून शिंदे ठाकरेंवर टीकेची तोफ डागणार आहेत. तसेच ठाकरेंच्या भाषणातील व्हिडीओ देखील ते दाखवणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोळीबार मैदानावर सभा होत असून या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिंदेंकडून या सभेतून ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना उत्तर दिले जाणार आहे. दरम्यान शिंदे गटाकडून ठाकरेंनी कोकणाकडे कसे दुर्लक्ष केले, ठाकरेंना सोडून का गेले? याचे स्पष्टीकरण सभेतून दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून शहरातील रस्त्यांवर दोन्ही बाजूला शिवसेना नेत्यांचे स्वागत फलक व भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. ही सभा आत्तापर्यंतची रेकॉर्डब्रेक सभा होणार असल्याचे शिंदे गटातील शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

खेडच्या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

खेडच्या सभेत जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाषण केले होते. त्यावेळी ठाकरेंनी ज्यांना जे शक्य होतं ते दिलं, पण ते आता खोक्यात बंद झाले आहेत अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलोय. तुमची सोबत मला हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही. जिथे रावण आपटला तिथे मिंधे गटाचं काय? असा खोचक यांनी लगावला होता.