मुख्यमंत्री थांबलेले महाबळेश्वर मधील `ते` हाॅटेल अनाधिकृत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या खासगी दौऱ्यावर महाबळेश्वर येथे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाबळेश्वरच्या हॉटेल ब्राईट लँड या हाॅटेलमध्ये वास्तव्य केलेलं होते. आता हे हॉटेल बेकायदेशीर बांधण्यात आलं असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन या हाॅटेलवर कारवाई करणार की दबावात अधिकृत करणार असा सवाल उपस्थित केला जावू लागला आहे.

महाबळेश्वर हे इको सेन्सिटिव्ह झोन असून या ठिकाणी बेकायदेशीर बांधकामांना परवानगी नसताना देखील हे हॉटेल बांधण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या हॉटेलचे काम थांबवण्याचे आदेश दिले असून संबंधितांवर फौजदारीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना या हॉटेलमध्ये आणून प्रशासनावर दबाव टाकण्याचे काम सुरु असल्याचा आरोप मोहिते यांनी केला आहे. या प्रमाणे महाबळेश्वर येथील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करावी, अन्यथा ठोस आंदोलन करण्याचा इशारा मोहिते यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, तातडीने अनाधिकृत बांधकामांवर कारवाई नको ः-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी अनाधिकृत अतिक्रमण करून हाॅटेल तसेच अन्य काही वास्तूचे बांधकाम करण्यात आले असल्याचे सांगितले होते. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले होते, सरकार गोरगरिबांचे आहे, कोणावर अन्याय करणार नाही. त्यांची रोजीरोटी बंद होणार नाही, तसेच तातडीने अतिक्रमणावर कारवाईही केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉटेल ब्राईट लँड येथे थांबल्यानंतरच म्हटले होते. त्यामुळे अनाधिकृत बांधकामांना अभय देण्याचा विषय या हाॅटेलपासूनच सुरू होणार का असा प्रश्न उपस्थित केला जावू शकतो.