हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cobra Snake) आजकाल मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. कारण जो तो डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शॉपिंगची हौस पूर्ण करू लागला आहे. अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्समुळे घरबसल्या आवडत्या वस्तूची निवड करणे आणि ती खरेदी करणे फार सोपे झाले आहे. यामध्ये Amazon ही शॉपिंग साईट टॉपमध्ये आहे. अमॅझॉनवर अनेक ग्राहक नियमित शॉपिंग करत असतात. मात्र, नुकताच एका दाम्पत्याला अमॅझॉनवर खरेदी केल्याचा पश्चाताप झाला असेल. या दाम्पत्याला आलेला भीतीदायक अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
काय झालं?
बंगळुरुत राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर दाम्पत्याने Amazon वर एक्स बॉक्स कंट्रोलर खरेदी केला होता. ज्याचं पार्सल घरी येताच त्यांनी खोललं आणि त्यांना घाम फुटला. कारण या पार्सलमधून चक्क जिवंत विषारी साप बाहेर आला. ज्याला पाहताच या दाम्पत्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली. विशेष म्हणजे, या बॉक्समधून बाहेर आलेला साप हा कोब्रा जातीचा (Cobra Snake) होता. त्यामुळे आपल्या समोर जिवंत कोब्रा पाहून या दाम्पत्याची अवस्था काय झाली असेल? याचा अंदाज आपण लावू शकतो. सुदैवाने हा विषारी साप पॅकिंगच्या टेपमध्ये अडकला होता आणि त्यामुळे दाम्पत्य सुखरूप आहे.
दाम्पत्याने शेअर केला व्हिडीओ (Cobra Snake)
हा धक्कादायक प्रकार सर्वांसमोर उघड करण्यासाठी बंगळुरुतल्या या सॉफ्टवेअर इंजिनिअर कपलने एक व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटलंय की, ‘आम्ही Amazon वरुन एक्सबॉक्स कंट्रोलर मागवला होता. त्या बॉक्समध्ये जिवंत साप होता. Amazon च्या डिलिव्हरी बॉयने हा बॉक्स आमच्या हातात दिला नाही तर तो आमच्या घराबाहेर हा बॉक्स ठेवून गेला होता. आम्ही बंगळुरुतल्या सराजपूर रोड या ठिकाणी असलेल्या इमारतीत राहतो. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसंच प्रत्यक्षदर्शीही आहेत, ज्यांनी आम्हाला याबाबत सांगितलं असं या दाम्पत्याने व्हिडीओत म्हटलं आहे’.
या घटनेसाठी जबाबदार कोण?
या दाम्पत्यातीलं सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने म्हटले, ‘सुदैवाने तो साप पॅकिंग टेपमध्ये अडकला होता. ज्यामुळे तो आम्हाला काही इजा करू शकला नाही. याबाबत आम्ही Amazonला संपर्क केला असता त्यांच्या ग्राहक सेवा अधिकाऱ्यांनी २ तास तुम्हीच या प्रसंगाशी दोन हात करा, असे सांगितले. त्यामुळे हा बॉक्स समोर ठेवून आम्ही त्यावर लक्ष ठेवला. ज्यात आमची अर्धी रात्र झाली. आम्ही दिलेले पैसे कंपनीने परत केले. पण, विषारी साप (Cobra Snake) आल्याचा जो धोका होता त्याचं काय? हा साप कुणाला चावला असता तर जीव गेला असता. Amazon कंपनीने निष्काळजीपणा केला आहे आणि त्यामुळे ही घटना घडली. या घटनेसाठी जबाबदार कोण आहे?’ असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला आहे.
Amazon कंपनीने दिलं उत्तर
या घटनेला सामोरे गेलेल्या इंजिनिअर दाम्पत्याने शेअर केलेल्या व्हिडिओ पोस्टवर Amazon कंपनीने खेद व्यक्त करत म्हटले, ‘आमच्या ग्राहकांना जो त्रास सहन करावा लागला त्याचे आम्हाला वाईट वाटत आहे. आमची टीम लवकरच तुम्हाला याबाबत माहिती देऊ’. यावर दाम्पत्याने म्हटले, ‘आम्हाला कंपनीने सगळे पैसे परत केले. (Cobra Snake) मात्र, अधिकृतरित्या त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही. तसेच घडलेल्या प्रकाराची नुकसान भरपाईदेखील दिलेली नाही. सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे आणि भविष्यातही यात काही सुधारणा होईल असं वाटत नाही’.