महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, निकाल 23 तारखेला; निवडणूक आयोगाची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मागच्या दोन दिवसांपासून विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार अशी चर्चा राज्यामध्ये सुरु होती. मात्र आज अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांसाठी विधानसभा निवडणुकांसाठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक साठी 22 तारखेपासून प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल आणि अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर ही तारीख निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे. तर 30 ऑक्टोबरला छाननी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार असून विधानसभा निवडणुकांचे निकाल हे 23 तारखेला जाहीर केले जाणार आहेत.

राज्यात 288 जागांकरिता होणार निवडणूक होणार असून २६ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपणार असल्याचे राजीव कुमार यांनी जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ९. ६३ करोड मतदार मतदान करतील. तर राज्यात १ लाख १८६ मतदान केंद्र असणार आहेत. ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ मतदारांना घरातूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार असल्याचे कुमार यांनी जाहीर केले.

किती टप्प्यात होणार निवडणूक ?

कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सध्याचा विचार करता महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी महायुती आघाडीकडे 218 जागा आहेत. भाजप (106), शिवसेना (40), राष्ट्रवादी (40), बीव्हीए (3), पीजेपी (2), मनसे (1), आरएसपी (1), पीडब्ल्यूपी (1), जेएसएस (1) आणि अपक्ष (12) .

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. या निवडणुकीत भाजप 105 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि 44 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते.

यावेळचे चित्र वेगळे

मात्र यावेळचे चित्र वेगळे असणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर आता एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांचे मिळून महायुती सरकार आणि दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट, उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे.