Friday, June 2, 2023

जिल्हाधिकाऱ्यांची भन्नाट डोक्यालिटी ! लसीकरण नाही तर दारू नाही,नियमाची सर्वत्र चर्चा

नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. अशात लसीकरण हे महत्वाचे ठरत आहे. संपूर्ण देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय अनेक राज्यांमध्ये अवलंबला जात आहे. त्यामुळे मात्र तळीरामांची चांगलीच पंचाईत झाल्याच्या अनेक घटना पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी सॅनिटायझर पिऊन लोक दगावल्याच्या तर काही ठिकाणी विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. मात्र उत्तर प्रदेश मधल्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी अजब आयडियाची कल्पना लढवली आहे ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

ही घटना उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील सैफईमधील आहे. तिथल्या प्रत्येक दारूच्या दुकानासमोर लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नसेल तर दारू मिळणार नाही, अशी नोटीस लावण्यात आली आहे. ही नोटीस अतिरिक्त जिल्हाधिकारी हेम कुमार सिंह यांच्या निर्देशानुसार लावण्यात आली आहे. या अजब आदेशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.तर तिथल्या दुकानविक्रेत्याने देखील सांगितले आहे की आम्ही ग्राहकाकडून लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र पाहूनच दारू विकतो आहोत.

हेम कुमार सिंग यांनी अलीगढ़मध्ये विषारी दारूच्या सेवनामुळे झालेल्या अनेक मृत्यूनंतर ही सूचना देण्यात आली आहे. अलीगड विषारी दारू घोटाळ्यानंतर हेम कुमार सिंह यांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांसह सैफई येथील दारू दुकानांची तपासणी केली. दरम्यान, हेम कुमार सिंग यांनी दारू दुकानांना स्पष्टपणे ‘लस नाही तर दारू नाही’ अशी नोटीस लावण्याच्या सूचना दिल्या. या महिन्याच्या सुरूवातीला अलिगडमध्ये विषारी दारू पिऊन कमीतकमी २५ जणांचा मृत्यू झाला होता.